आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीशी आघाडी होणारच;पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणारच, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी निवडणुकीची घोषणा होताच दिले. तसेच गेल्या पंधरा वर्षांमधील कामाच्या बळावर पुन्हा एकदा महाराष्ट्रातली जनता आपल्याला संधी देईल, अशा विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत राज्यातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर घेतलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुक ही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती विरूद्ध काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी या दोघांमध्येच थेट लढवली जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री चव्हाण यांनी राष्ट्रवादीसाेबत आघाडी होणार याचे स्पष्ट संकेत दिले.

१० टक्के जागांवरच तिढा
आघाडीच्या जागावाटपातला तिढा केव्हा सुटणार? या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, दोन्ही पक्षांदरम्यान आमच्या पाचवेळा चर्चा झाल्या असून जवळपास ९० टक्के जागांचा प्रश्न सुटला आहे. येत्या एक दोन दिवसात त्यावरही चर्चा करून जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावला जाईल. तसेच एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाऊन जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला

बीड पोटनिवडणुकीत उमेदवार नाहीच
बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुंडे परिवारापैकी कोणी उभे राहिल्यास आपण उमेदवार देणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अगोदरच केली होती. त्यावर काँग्रेस पक्षाचे काय मत आहे असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, बीड लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि त्यांनी जर असा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करू. आमचा राष्ट्रवादीला या मुद्यावर पाठिंबा असेल.

मतदारसंघाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार
आपण कुठल्या मतदारसंघातून निवडणुक लढवणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी कुठून निवडणुक लढवावी याचा निर्णय केंद्रीय निवड समिती घेईल. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ही समिती कदाचित येत्या दोन दिवसातच याचा अंतिम निर्णय जाहीर करणार येईल. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधूनच निवडणुक लढवण्याची इच्छा केंद्रीय निवड समितीसमोर व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

विकासकामांच्या बळावर पुन्हा सत्तेत
आघाडीने गेल्या पंधरा वर्षांत केलेला विकास आणि महायुतीची अवघी साडेचार वर्षांची सत्ता याची तुलना करून महाराष्ट्रातली जनता पुन्हा आपल्या हातीच सत्ता सोपवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच अनेक नैसर्गिक आपत्तीनंतरही राज्य देशात प्रथम क्रमांकावर ठेवण्यात आपण यशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

आणखी उंच भरारी घेणार
या राज्यात भविष्यकाळात आपल्याला बौद्धीक कौशल्यावर आधारित व्यवस्था निर्माण करायची आहे. जिथे कोणीही उपाशी नसेल, गरीबी नसेल, प्रत्येकाला घर, मोफत शिक्षण आणि आरोग्य मिळेल अशी सर्व सुखसोयींनी युक्त अशी शहरे आणि गावे आपण बनवणार असून त्याबाबतचा विचार जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडू असेही मुख्यमंत्री म्हणाले. अजून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे सांगत ‘आम्ही पुढे जाणार आणि अधिक उंच भरारी घेणार’ असा दावाही त्यांनी केला.