आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress ncp Loksabha Seats Sharing Formula May Done In Two Days

जागा वाटप दोन दिवसांत, राष्ट्रवादीच्या धक्कातंत्राने काँग्रेस कामाला लागली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून आमचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेससोबत आघाडीसाठी चर्चेचे आवाहन केले होते. पण त्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याची जाहीर वाच्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांची जीभ चाचपडायला लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे जागा वाटप चार नव्हे, दोन दिवसांत करू. राष्ट्रवादीने त्यासाठी सहकार्य करावे व लवकरात लवकर चर्चा पूर्ण करावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या ‘रामटेक’ या बंगल्यावर झाली होती. त्यावेळी आघाडीचे जागा वाटप लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा सर्वच नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जागावाटप पुढील चार दिवसांत झाले पाहिजे. तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळवा म्हणजे आमच्या पक्षाला पुढील निवडणुकीची रणनिती आखता येईल, असे काँग्रेसला स्पष्ट शब्दात सांगितले होते.
त्यानंतर खाड्कन जागे झालेल्या काँग्रेस नेत्यांची धावपळ उडाली. राष्ट्रवादीशी आघाडी तुटल्यास दिल्लीतील काँग्रेस नेते राज्यातील नेत्यांना जबाबदार धरतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंना लगेच कामाला लावल्याची चर्चा आहे. पटेलांनी मुख्यमंत्री चव्हाणांची काल सायंकाळी भेट घेऊन याबाबत तत्काळ पावले उचलण्याची विनंती केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव ठाकरेंनी चार नव्हे दोन दिवसांत जागावाटपाचा चर्चा पूर्ण करू असे सांगितले.
त्यानंतर काँग्रेसनेही लवकरात लवकर जागा वाटपाचे त्रांगडे सोडवू असे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचे अधिकार अँटोनी समितीने राज्यांतील काँग्रेस नेत्यांना दिले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आता ही चर्चा कधी संपवायची, हे राष्ट्रवादीने ठरवावे. दोन दिवसांत चर्चा पूर्ण करण्यावर काँग्रेसचा भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने त्यासाठी सहकार्य करावे. याचबरोबर आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि इतर काही पक्षांनाही सामावून घेण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी महाराष्ट्रात 22 जागांवर ठाम असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी आज रत्नागिरीत केले आहे. जागा वाटपाला आता खूप उशिर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता तरी याबाबत चर्चा करावी व जागा वाटपाचा प्रश्न सोडवावा असे म्हटले आहे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात. त्यामुळे राज्यातील त्यांच्या नेत्यांशी बोलताना मर्यादा येतात असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री चव्हाण-ठाकरे जोडीला लगावला.