आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी नेत्यांची \'वर्षा\'वरील बैठक संपली; ठोस निर्णय नाहीच, सायंकाळी पुन्हा बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपासाठी अंतिम बैठक मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी झाली. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीने 134 जागांचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेसने 124 पेक्षा अधिक जागा द्यायच्या असतील तर दिल्लीतील नेत्यांशी बोलूनच निर्णय घेतला जाईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे आज सायंकाळी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. युतीचा निर्णय अद्याप झाला नसल्याने आघाडीची टोलवाटोलवी सुरूच आहे.
आघाडीतील जागावाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो आज सायंकाळच्या बैठकीत अंतिम असेल असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीने तडजोडीची तयारी असेल तरच चर्चेला यावे अन्यथा आपापला मार्ग निवडावा असा गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या बैठकीत व एकूनच जागावाटपाबाबत नमते घेईल असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीला 130 जागा मिळू शकतात मात्र त्यापुढील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
काँग्रेसने आक्रमक भूमिका राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला सतत अल्टिमेटम दिल्यानंतरही काँग्रेसने हा विषय रेंगाळत कसा राहील याचीच दक्षता घेतल्याचे दिसून आले आहे. भाजप व शिवसेना युतीचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीने टोलवाटोलवी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते एकमेंकांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांच्यात सुसंवाद असल्याचे नेत्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे युतीच्या भवितव्याचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आघाडीत अशीच टोलवाटोलवी सुरु राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

दुसरीकडे, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र राहावे, ही आम्हा नेत्यांची प्रामाणिक भावना आहे. पंधरा वर्षापासून आपण एकत्र आहोत. जातीयवादी पक्षांचे मोठे आव्हान असताना या निवडणुकीलाही एकत्रपणेच सामोरे जावे. जागावाटपाचा प्रश्न सोडवताना काँग्रेसने सन्मानजनक, सामंजस्यपूर्ण आणि अनुकूल असा प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस-राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्त्वात जागावाटपात जवळपास समझोता झालेला आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला 128 ते 130 जागा देऊ केल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी किमान 134 ते 136 जागांची मागणी करीत आहे. विरोधी पक्षांची महायुती झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीला 130 च्या आसपास जागा सोडू शकते. मात्र, युतीचा निर्णय झाल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घ्यायचा नाही हे दोन्ही काँग्रेसचे धोरण आहे. शिवसेना-भाजप महायुतीवर आघाडीतील दोन्ही घटकपक्ष बारीक लक्ष ठेवून आहेत. ही युती फिसकटली तर राज्यात नवीनच राजकीय स्थिती तयार होईल. अशा स्थितीत चौरंगी-पंचरंगी लढती झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीला आपण सर्वाधिक जागा जिंकू शकतो असा विश्वास वाटतो. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच ज्या ठिकाणी विरोधक प्रबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती करून एकमेंकांना सहकार्य करण्याचे धोरण ठरविले आहे. जेणेकरून आघाडीला चौथ्यांदा सत्ता हस्तगत कशी करता येईल हे पाहायचे हे धोरण ठरल्याने महायुतीचा फैसला झाल्याशिवाय आघाडीच्या जागावाटपाला वेग येणार नाही. तसेच अंतिम निर्णयही होणार नाही, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.