आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते अडचणीत; लॉटरी घोटाळ्याची चाैकशी होणार, मुखमंत्र्यांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आघाडी सरकारच्या काळातील हजारो कोटी रुपयांचा ऑनलाइन लॉटरी घोटाळा निवृत्त आयएएस अधिकारी आनंद कुळकर्णी यांनी उघडकीस आणला असून गरज पडल्यास या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाल्याचा आणि त्याला तत्कालीन लॉटरी आयुक्त कविता गुप्ता यांची साथ लाभल्याचा आरोपही कुळकर्णी यांनी केला आहे. अाधीच भ्रष्टाचाराच्या अाराेपामुळे भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीत या अाराेपांमुळे वाढ हाेऊ शकते.

कुळकर्णी हे बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. मात्र सत्तांतर होऊनही फडणवीस सरकारनेही या घोटाळ्यावर कारवाई का केली नाही? हा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, ‘या घाेटाळ्याचा अहवाल अनेक वर्षे दडवून ठेवण्यात आला होता, असे सकृतदर्शनी दिसते. मात्र सत्यता पडताळून पाहू आणि गरज भासल्यास कारवाई केली जाईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लॉटरी घोटाळ्याची गरज पडल्यास सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. मात्र हा घोटाळा अब्जावधीचा असल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. ‘राज्याला पूर्वी लॉटरीतून दरवर्षी ६० ते ९० कोटी उत्पन्न मिळत होते आणि आता १०० ते १५० कोटी उत्पन्न मिळते. त्यामुळे तीन वर्षांत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा खोटा आहे. विविध राज्यांतील लॉटऱ्यांनी महाराष्ट्रात आपले दुकान थाटले होते. मात्र या लॉटरीवरील कर सरकारला न देता त्यांनी राज्यातून पळ काढला. अशा कंपन्यांवर कारवाईसाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून यापूर्वीच विधिमंडळात या विषयावर आपण निवेदन दिले आहे. या घोटाळ्याची गरज भासल्यास सीबीआयकडून चौकशी करण्यात येईल,' असे मुनगंटीवार म्हणाले.

काय अाहे प्रकरण?
> २००६ ते २००९ या काळात लॉटरी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यावर सीआयडी महासंचालकांनी चौकशी करून त्याचा अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दाबून घोटाळेबाजांना पाठीशी घातल्याचा आरोप अानंद कुळकर्णी यांनी केला.

> ऑनलाइन लॉटरीसाठी अभिकर्ता नेमण्याकरिता सरकारने निविदा मागविल्या. तेव्हा मार्टिन एजन्सीज लि. यांची एकच निविदा आली. त्यामुळे त्यांना ठेका देण्यात आला. ही दोन अंकी लॉटरी असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र एक अंकी असून, ती केंद्र सरकारच्या १९९८ च्या लॉटरी कायद्याचा भंग करणारी आणि सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडविणारी असल्याची तक्रार दक्ष नागरिक नानासाहेब कुटे यांनी केली हाेती.

> मार्टिन एजन्सीने लॉटरी संचालनालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपये कमावले. नियमानुसार लॉटरीची सोडत आणि त्यासाठीचा सर्व्हर राज्यात असणे बंधनकारक असतानाही कंपनीचा सर्व्हर मात्र तामिळनाडूत होता. तेथून ही कंपनी कमी तिकिटांची विक्री झालेल्या क्रमांकावर लॉटरी घोषित करत असे, असेही कुळकर्णी यांनी माध्यमांना संागितले.
शासकीय लॉटरीच्या नावाखाली एक अंकी बनावट ऑनलाइन लॉटरी ठेवून सरकारचा महसूल बुडवण्यात आला. या घोटाळ्याबाबत विधिमंडळातही आरोप झाल्यानंतर सीअायडी चौकशीचे आदेश तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलिस महासंचालक एस. पी. एस. यादव यांनी हा गैरव्यवहार उघड करणारा अहवाल नोव्हेंबर २००७ मध्ये सरकारला सादरही केला होता. त्यावर कारवाई झाली असती तर मोठा घोटाळा उघडकीस आला असता आणि त्यात वित्त विभागातील अनेक अधिकारीही अडकले असते. मात्र सरकारने या अहवालावर गोपनीयतेचा शिक्का मारून तो दडपून ठेवला. आता माहितीच्या अधिकारातून हा अहवाल आपण मिळवला, असे कुळकर्णी यंानी सांगितले.

जयंत पाटलांकडे बाेट
माजी मंत्री जयंत पाटील यांच्या आशीर्वादामुळेच या लॉटरीत घोटाळा झाला आणि त्याचा अहवाल दाबण्यात आल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती अानंद कुळकर्णी यांनी दिली. दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी कुळकर्णी यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली होती त्यामुळे कुळकर्णी यांनी हे आरोप तर केले नाही ना, अशी चर्चाही रंगली आहे.
बातम्या आणखी आहेत...