मुंबई - केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून सोमवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हजारो कार्यकर्त्यांसमवेत सीएसटी ते ठाणे असा विनातिकीट प्रवास करून
सविनय कायदेभंग करणार आहेत.
रेल्वेच्या प्रवासी आणि मालभाड्यात केंद्र सरकारने केलेली अनुक्रमे 14.2 आणि 6.5 टक्के वाढ निषेधार्ह आहे. प्रवासी आणि मालवाहतूक अशा दोन्ही भाडेवाढ झाल्याने नागरिकांना दुहेरी फटका बसणार आहे. मुंबईकरांवर तर भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने अत्याचारच केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
उपनगरीय रेल्वेच्या मासिक प्रवासी भाड्यात झालेली वाढ अन्यायी आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व 6 जागा भाजप-सेनेला देणा-या मुंबईकरांना मोदी सरकारने भाडेवाढीचे गिफ्ट दिले आहे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल सेवेच्या भाड्यात 250 टक्क्यांपर्यंत वाढ म्हणजे कहरच म्हणावा लागेल, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी या वेळी केली.
यापूर्वी लहानसहान मुद्द्यांवरही आंदोलन करणा-या शिवसेनेने रेल्वे भाडेवाढीचा साधा निषेधही करू नये, हे आश्चर्यकारक आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींनी देशाला अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातील सरकारची वाटचाल पाहता मोदी आणि भाजपच्या लेखी अच्छे दिनचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
केंद्र सरकारने दरवाढ रद्द केली नाही, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाचा पहिला भाग म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते सोमवारी सीएसटी ते ठाणेपर्यंत विनातिकीट प्रवास करून सविनय कायदेभंग करणार आहेत.
दरवाढ मागे न घेतल्यास 25 तारखेस राज्यातील प्रमुख रेल्वेस्थानकांवर काँग्रेस कार्यकर्ते तीव्र निदर्शने करतील. लाखो प्रवाशांच्या स्वाक्ष-या एकत्रित करून त्या केंद्र सरकारला पाठवल्या जातील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार अनंत गाडगीळ, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.