आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक : काँग्रेसची सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांनाच पुन्हा उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तरुणाईला संधी देण्याची भाषा करणार्‍या कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवावयाच्या दोन्ही जागेवर सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. गेली अनेक वर्षे खासदारकी उपभोगलेल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्या रूपाने सध्या घरातच सत्ता असलेल्या मुरली देवरा यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन काँग्रेसने नवे चेहरे देण्याची आपलीच घोषणा बासनात गुंडाळली आहे.

काँग्रेसच्यावतीने 77 वर्षीय मुरली देवरा आणि 71 वर्षीय हुसेन दलवाई यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली आहे. देवरा यांनी 25 वर्षांहून अधिक काळ मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आणि त्यांच्या काळात काँग्रेस पक्षाची मुंबईत वाताहत झाली आणि शिवसेनेचा प्रचंड विस्तार झाला. मात्र काँग्रेस श्रेष्ठींसोबत त्यांच्या असलेली जवळीक आणि पक्षाला त्यांच्याकडून होणारी ‘अर्थ’पूर्ण मदत यामुळे त्यांना केंद्रिय पेट्रोलियम मंत्रीपद देण्यात आले. तब्बेतीचे कारण सांगून देवरांना मंत्रिमंडळातून वगळतानाच त्यांचे पुत्र आणि मुंबईचे खासदार मिलिंद देवरा यांची केंद्रिय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लावून कॉँग्रेसने ‘घराणेशाही’ची परंपराही जोपासली होती.
राहूल गांधी यांनी पक्षातील सूत्रे जवळपास आपल्या हाती घेतल्यानंतर देवरा यांच्याऐवजी नवा चेहरा किंवा पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास राज्यसभेवर संधी दिली जाईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र काँग्रेस देवरांना तिकिट नाकारण्याचे धाडस दाखवू शकले नाही. दलवाई यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या रिक्त जागेवर केवळ अडीच वर्ष मिळाल्याने त्यांना बहुधा एक पूर्ण कार्यकाळ देण्यात आला.

मुरली देवरा आणि हुसेन दलवाई यांची सध्याच्या राज्यसभेची मुदत येत्या एप्रिलमध्ये संपत आहे. या दोघांनीही सोमवारी विधानभवनात मुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले.

देवरांची 29 कोटींची संपत्ती
देवरा यांनी आपल्या कुटुंबाकडे 29 कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. देवरा यांच्या 4.56 कोटींच्या तर पत्नी हेमा यांची 9.22 कोटींच्या ठेवी बँका आणि अन्य बचत योजनांमध्ये आहेत. देवरांच्या बॅँक खात्यात 79 लाख, हातात एक लाखाची रोकड आहे. दोन कोटी 31 लाखांचे रोखे, 20 लाखांची गुंतवणूक टपाल व इतर योजनांमध्ये तर 54 लाखांचे इतर उत्पन्न आहे. पत्नीकडे 79 लाखांची ठेव, पाच कोटींची इतर गुंतवणूक तर 40 लाखांचे दागिने आहेत. 44 लाखांचे इतर येणे आहे. आपल्याकडे अ‍ॅम्बेसेडर तर पत्नीकडे होंडा सीआरव्ही, निसान व स्कोडा सुपर्ब गाड्या आहेत. आपल्याकडे 2.37 कोटींची तर पत्नीकडे 11.82 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. खंडाळ्याला अकृषक जमीन, मुंबईत फ्लॅट व कार्यालय आहे, असे देवरा यांनी नमूद केले आहे.

पवारांप्रमाणेच कोट्यधीश दलवाईंकडेही गाडी नाही
हुसेन दलवाई यांनी आपल्याकडे एकूण साडेचार कोटींच्या ठेवी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दलवाई यांची विविध बँक खात्यात सुमारे 63 लाखांच्या ठेवी आहेत तर त्यांची पत्नी शमा यांच्या नावे 1 कोटी 67 लाखांच्या ठेवी आहेत. दलवाई यांच्याकडे 52 लाख 50 हजारांची तर शमा यांच्याकडे 1 कोटी 71 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. आपल्याकडे तसेच पत्नीकडे कोणतीही गाडी नाही, असे दलवाई यांनी शपथेवर सांगितले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्याकडे एकही गाडी नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे.