आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या काँग्रेसींना जोडण्यासाठी काँग्रेस नेत्यांची विशेष मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने जुन्या काँग्रेसींना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याची मोहीम हाती घेतली आहे.‘व्हिजन 2014’ या मोहिमेचा एक भाग असलेल्या व्यापक जनसंपर्क मोहिमेंतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच घर तिथे काँग्रेस या कार्यक्रमातूनही लोकांमध्ये जाण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने ‘व्हिजन 2014’ च्या शेवटच्या टप्प्यातल्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. या टप्प्यात थेट लोकांमध्ये जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुन्या काँग्रेसींना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नोकरी किंवा कामानिमित्त स्थलांतर अशा काही कारणास्तव काँग्रेसपासून दुरावलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना त्या त्या भागात जाऊन भेटणे, तसेच विविध भागांतल्या काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते नसलेल्या पण काँग्रेसच्या विचारांशी सहमत असलेल्या वकील, डॉक्टर, प्राध्यापक यासारख्या प्रतिष्ठित लोकांच्या भेटी घेण्यावर भर दिला जात आहे. त्याच्याच जोडीला जिथे उमेदवार निश्चित झाला आहे अशा मतदारसंघात घर तिथे काँग्रेस या संकल्पनेवर आधारित प्रचार करण्यात येणार आहे. काँग्रेसने आपल्या सत्तेच्या कार्यकाळात जी लोकोपयोगी कामे केली आहेत. त्या कामांची माहिती या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन दिली जाणार आहे.
जुन्या- नव्याचा मेळ हवाच : सावंत
भाजप, मनसे, राष्ट्रवादी हे पक्ष सोशल मीडियाच्या साह्याने हायटेक प्रचारावर भर देत असताना काँग्रेस मात्र जुन्याच प्रचारतंत्रावर भर देताना दिसते. याबाबत काँग्रेस प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले की, जरी आम्ही टेक्नॉलॉजीसह जुन्या पारंपरिक पद्धतीचाही वापर करत आहोत. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी न वापरणाराही मोठा वर्ग आहे. त्या वर्गापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.