आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Party Once Again Remeber Minority For The Vote

बेरजेच्या राजकारणासाठी काँग्रेस पक्षाला पुन्हा अल्पसंख्याक आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय जाहीरनाम्यासाठी कॉँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली. यात अल्पसंख्याकांच्या योजनांबाबत सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अल्पसंख्याक समाज काँग्रेसपासून दूर जात असल्याने त्यांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केल्याचे समजते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करणार आहे. या जाहीरनाम्यासाठी सूचना पाठवण्याचे निर्देश काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिले होते. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी एका समितीची स्थापना केली. या समितीची मंगळवारी काँग्रेस कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला महाराष्ट्राचे सहप्रभारी बाला बच्चन, वनमंत्री पतंगराव कदम, समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, आरोग्य मंत्री डॉ. सुरेश शेट्टी, अल्पसंख्याक मंत्री नसीम खान, राज्यमंत्री रणजित कांबळे, राजेंद्र गावित, डी. पी.सावंत आदी उपस्थित होते.

सच्चर शिफारशी राबवणार
अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेसचा महत्वाचा मतदार मानला जातो. परंतु गेल्या काही काळापासून हा समाज काँग्रेसपासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे. बैठकीत या विषयावर अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली. सच्चर समितीने आपला अहवाल दिलेला आहे. अल्पसंख्याक समाजात इतरही अल्पसंख्याक येतात परंतु सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समुदायासाठी विशेष योजनांबाबत काय करता येईल यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली. आणखी दोन-तीन दिवसांनी राज्यातील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सर्व शिफारशींवर विचार करून ही समिती राज्याच्या शिफारशी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवणार आहे.


मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी
बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले की, या बैठकीत सामाजिक न्याय, आदिवासी विकास, आरोग्य, ग्रामीण योजना, युवकांसाठीच्या योजना आणि क्रीडा योजनांवर चर्चा झाली. पायाभूत सुविधांवरही चर्चा झाली परंतु मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने या मुद्दय़ावर जास्त भर देण्यात आला नाही. मुख्यमंत्री स्वत: या विषयावर चांगले बोलतील, असे सांगण्यात आहे. मंत्री आणि आमदारांकडून योजनांबाबत माहिती घेण्यात आली. तसेच काही जणांनी याबाबत सविस्तर टिपण देतो, असे सांगितल्याची माहितीही सूत्रांनी दिली.