आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीच्या निकषांवर काँग्रेसचे नेते उठवणार रान, सरकारला घेरण्याची योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अपेक्षा नसताना फडणवीस सरकारने यूटर्न घेत इतक्या तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घाेषणा केली. त्यामुळे सर्वच विराेधकांची काेंडी झाली अाहे. या कर्जमाफीची अंमलबजावणी झाल्यास त्याचा लाभ भाजपला होईल. ताे हाेऊ नये म्हणून कर्जमाफीच्या निकषाचा मुद्दा धगधगत ठेवायचा, सरसकट कर्जमाफीसाठी काेणतेही निकष लावण्याचा सरकारचा डाव हाणून पाडायचा अाणि भाजपला कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ मिळू द्यायचा नाही, अशी रणनीती काँग्रेस पक्षाने आखली आहे.
    
कर्जमाफीच्या निकषासंदर्भात चर्चा करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाने कर्जमाफीसंदर्भात आपली भूमिका निश्चित करण्यासाठी टिळक भवन येथे बुधवारी बैठक घेतली.  त्यास सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे अशी पक्षातील पहिल्या फळीची नेतेमंडळी हजर होती.
 
मराठा क्रांती मोर्चानंतर म्हणजे जानेवारीपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला होता. त्यात विरोधकांच्या संघर्ष अाणि आत्मक्लेश यात्रांनी अधिक हवा भरली. त्यामुळे अाधी नाही नाही म्हणणाऱ्या फडणवीस सरकारने यूटर्न घेत शेवटी चक्क कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. सरकार काही केल्या कर्जमाफीस तयार होणार नाही, अशी विरोधकांना पूर्ण खात्री होती. परंतु कर्जमाफी झाल्याने आता विरोधकांचीच पाचावर धारण बसली आहे. 
 
कर्जमाफी जाहीर तर झालीय, आता कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर अापली काही खैर नाही. फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा मुद्दाच संपून जाईल. त्यामुळे कर्जमाफीच्या निकषांवर फडणवीस सरकारला जेरीस आणायचे, असे काँग्रेसचे डावपेच असल्याचे बैठकीतील सहभागी नेत्याने सांगितले. 
 
कर्जमाफीला शेतकरी पात्र ठरण्यासाठी सरकार अनेक निकष लादणार आहे. निकषांमुळे १ कोटी ३६ लाख एकूण शेतकऱ्यांपैकी निम्मे शेतकरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. म्हणून पक्षाने ‘सरसकट’ कर्जमाफीचा मुद्दा लावून धरायचे ठरवले आहे, असा एक नेता म्हणाला.  

पीक कर्ज माफ होणार तर आहेच, पण शेतकऱ्यांनी पाइपलाइन किंवा शेती यांत्रिकीकरणासाठी घेतलेली कृषिपूरक कर्जेसुद्धा माफ करावीत, अशी नवी मागणी काँग्रेस पक्ष आता लावून धरणार आहे. तसेच संघर्षयात्रेत जशी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यात आली होती तशीच एकजूट सरसकट कर्जमाफीसाठी बांधण्यात येणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘सरसकट कर्जमाफी’ या मुद्द्यावर राज्यातील फडणवीस सरकारला कोंडीत पकडायचे, असा निर्णयही या बैठकीत झाला आहे. एकूणच फडणवीस सरकार अाणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधक यांच्यात पुढची लढाई ही सरसकट कर्जमाफीच्या निकषांवर होणार हे आता निश्चित झाले आहे.  

श्रेय केवळ शेतकऱ्यांचे    
शिवसेना अाणि सर्व शेतकरी संघटना कर्जमाफीच्या आंदोलनात सुरुवातीस सहभागी नव्हत्या. आंदोलन पेटल्यावर ते सहभागी झाले. फडणवीस सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली त्याचे श्रेय मागच्या तीन वर्षांत ज्या साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सर्वस्वी त्यांचे आहे.   
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

कर्जमाफी सरसकट हवी   
कर्जमाफीचा कट आॅफ दिनांक जाहीर करावा, नवे पीक कर्ज मिळेपर्यंत एकरी दहा हजार उचल शेतकऱ्यास द्यावी, कृषिपूरक कर्जेसुद्धा माफ करावीत अाणि काेणतीही मर्यादा न घालता सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा मागण्या फडणवीस सरकारकडे काँग्रेस करणार आहे.
- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.   
बातम्या आणखी आहेत...