आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या धोरणांमुळे दहशतवाद बोकाळला - व्यंकय्या नायडू यांची टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - काँग्रेसच्या चुकीच्या राजकीय धोरणांमुळे आणि बोटचेप्या परकीय नीतीमुळेच देशात दहशतवाद बोकाळला असून काँग्रेसच्या धोरणांनीच दहशतवादाला प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप देशात भगवा दहशतवाद पसरवत असल्याच्या आरोप नुकताच केला होता. त्याला उत्तर देताना भाजपच्या वतीने गुरुवारी मुंबई प्रदेश कार्यालयाबाहेर शिंदे आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपचे राज्य प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.भाजपसारख्या पक्षावर दहशतवादी कारवाया करत असल्याचा आरोप काँग्रेसने केवळ राजकीय स्वार्थापोटी केला असून असे बिनबुडाचे आरोप करणा-या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. त्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानला मदत होणार असून देशासमोरील दहशतवादाचा प्रश्न अधिक बिकट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादाला जात अथवा धर्म नसताना आता काँग्रेस आणि शिंदे, चिदंबरम यांनी धर्माचा रंग देण्याचा केलेला प्रयत्न निंदनीय असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देशात गेल्या काही वर्षांत दहशतवाला प्रोत्साहन मिळाले असल्याचा आरोप त्यांनी केला.