आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफांच्या दौर्‍याबाबत शिवसेना गप्प का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ भारत दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍याबाबत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने तोंडात मिठाची गुळणी का धरली आहे?’ असा सवाल कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
प्रसिद्धिपत्रकात सावंत यांनी म्हटले आहे की, ‘केवळ भारत-पाकिस्तानच नव्हे तर जगातील सर्वच देशांनी द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी शक्यतोवर संवाद व सौहार्द कायम ठेवला पाहिजे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसनेही नेहमी हेच धोरण स्वीकारले आहे आणि गरज भासली त्यावेळी पाकिस्तानात घुसून त्यांना अद्दलही घडवली आहे. परंतु काँग्रेसच्या या धोरणावर भाजप व शिवसेनेने कायम आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या कागदी वाघांनी तर वेळोवेळी पोकळ डरकाळ्या फोडल्या. पाकिस्तानने पंतप्रधानांचा भारत दौरा तर फार मोठी बाब झाली, पण तेथील क्रिकेटचा संघ किंवा कलावंतांनाही भारतात पाय न ठेवू देण्याची ढोंगी भूमिका त्यांनी वारंवार स्वीकारली. मग आता हे गप्प का?’ असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे.
‘पाकिस्तानबाबत काँग्रेसच्या धोरणावर कायम टीका करणार्‍या भाजपच्या नियोजित पंतप्रधानांनी आता स्वत:च नवाज शरीफ यांना निमंत्रण दिले आहे. त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया अपेक्षित नसली तरी किमान शिवसेना तरी त्यावर बोलेल, अशी अपेक्षा होती. परंतु यासंदर्भात शिवसेनेने बाळगलेले मौन बघता पाकिस्तानबाबत त्यांची आजवरची भूमिका केवळ राजकीय सोयीची होती’, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
भारताच्या नियोजित पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शपथविधीसाठी निमंत्रित करणे अजिबात गैर नाही. मात्र, हिच भूमिका काँग्रेसने घेतली असती तर भाजप व शिवसेनेचा काय युक्तिवाद राहिला असता, असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला.