आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Real Anti Nation Communial Party, Rajnathsingh Critised

काँग्रेसच देशातील खरा जातीयवादी पक्ष, राजनाथसिंह यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 360 जागा मिळतील, हा राहुल गांधींचा आशावाद म्हणजे निव्वळ दिवास्वप्न आहे,’ असा टोला भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला. काँग्रेसच देशातील खरा जातीयवादी पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली.


पाच राज्यांतील निवडणुकांच्या तयारीसाठी मुंबईत भाजपच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मंगळवारी राजनाथसिंह आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भाजप आगामी निवडणुका विकास आणि सुशासन या मुद्द्यांवर लढवणार आहे. अल्पसंख्याकांना कुरवाळून काँग्रेस मात्र निवळ जातीयवादी राजकारण करत आहे. ‘देशातील नैसर्गिक स्रोतांवर पहिला अधिकार अल्पसंख्याक समाजाचा आहे’, या पंतप्रधानांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. तसेच ‘निरापराध मुस्लिम युवकांना तुरुंगात डांबू नका’, असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यांना पाठवलेले पत्र ताबडतोब मागे घ्यावे, अशी मागणी करतानाच देशात भगवा दहशतवाद नसून काँग्रेसने पसरवलेला तो गैरसमज असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. मनमोहन आणि नवाझ यांची अमेरिकेत बोलणी चालू होती. त्याचवेळी काश्मीरमधील केरान येथे भारतीय जवान घुसखोरांशी झुंज देत होते. ‘टेरर आणि टॉक’ साथ- साथ असूच शकत नाही. केरान घुसखोरीचा अहवाल पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत द्यावा, अशी मागणीही राजनाथ यांनी केली.


महायुती तुटणार नाही
रामदास आठवले आपल्याला सकाळी भेटले. त्यांना राज्यसभा देण्याबाबत चर्चा झाली नाही. मात्र, रिपाइं महायुतीमधून बाहेर पडणार नसल्याचे राजनाथ यांनी नमूद केले.
जागतिकीकरण, उदारीकरणाला विरोध नाही. मात्र, देशातील सध्या आलेली आर्थिक अराजकता संपवण्यासाठी पर्यायी आर्थिक मॉडेलचा विचार करण्याची वेळ आली आहे. तेलंगणाच्या निर्मितीला भाजपचा पाठिंबा आहे, असे सिंह यांनी जाहीर केले.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना स्वगृही घेण्याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय संसदीय बोर्ड घेईल, असे सिंह म्हणाले. देवालय हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. मात्र, महिलांना उघड्यावर शौचालयास बसावे लागणे शरमेचीच गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘शौचालयानंतर देवालय’ या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर दिली.


महाराष्‍ट्र म्हणजे दुष्काळ
देशातील 25 टक्के धरणे एकट्या महाराष्‍ट्र राज्यात आहेत. तरीही येथे दरवर्षी दुष्काळ पडतो. ही दुर्दैवाची बाब असून राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी निपक्ष:पाती व्हावी, अशी मागणी सिंह यांनी केली.


‘मनसे’पासून चार हात लांबच !
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीत मनसेचा विचार करायचा नाही, असा निर्णय राजनाथसिंह यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मनसेला स्वत:हून भाजपसोबत यायचे असेल तर ठीक, अन्यथा तीन पक्षांची युती कायम राहील, अशी चर्चाही या वेळी झाली. मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट शिवसेनेची नाराजी भाजपला ओढवून घ्यावी लागली. रामदास आठवलेही मनसेसाठी उत्सुक नव्हते. मात्र, ऑगस्टमध्ये मनसेने लोकसभेसाठी तीन उमेदवारांची नावे निश्चित केल्याने त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती.