आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुद्रांकप्रकरणी चौकशीबाबत गोटे यांच्या मागणीला पाठिंबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीची आणखी कोंडी करण्यासाठी भाजप व काँग्रेस एकत्र आल्याचे बुधवारी विधानसभेत पाहायला मिळाले. तेलगी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केल्यानंतर या मागणीला काॅंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दिला.

मुंबईत पकडण्यात आलेल्या बनावट स्टॅम्प पेपरचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सरदार तारा सिंह यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना तेलगी प्रकरणात सहभागाचा अाराेप झालेले गोटे यांनी याप्रकरणी भुजबळांच्या चौकशीचा मुद्दा मांडला. ‘तेलगीकडे भिवंडी येथे ३ हजार कोटींचे स्टॅम्प पेपर आढळले होते. मात्र, यापैकी ७० टक्के खरे होते. हे स्टॅम्प पेपर भारत प्रतिभूती मुद्रणालयात छापण्यात आले होते. मात्र, या मुद्रणालयाची चौकशी झाली नाही? काही कोटींचे स्टॅम्प पेपर तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नाशिकच्या घरात आढळले होते. यासंदर्भात काय चौकशी केली,’ असा प्रश्न गोटे यांनी विचारला. तेलगी घोटाळा झाला तेव्हा भुजबळ हेच राज्याचे गृहमंत्री होते. मात्र, यावर भाष्य करण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. ‘मूळ लक्षवेधीचा हा विषय नव्हता. त्यामुळे माझ्याकडे तेलगी घोटाळ्याबद्दल सध्या काहीही माहिती नाही,' असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘गोटे यांनी मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जोवर सरकार त्याची माहिती देत नाही तोवर ही लक्षवेधी राखून ठेवा,' अशी मागणी चव्हाण यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...