आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयएम’- भाजपची मतपेढीसाठी हातमिळवणी, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार देणारे ‘एमआयएम’चे आमदार वारिस पठाण यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले. भाजपने मांडलेल्या निलंबनाच्या या ठरावास काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यानंतर आता राजकीय लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. मतपेढी भक्कम करण्यासाठी एमआयएम आणि भाजप यांच्यात हातमिळवणी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, तर मुस्लिम मतपेढी हातातून निसटत असल्याने असे आरोप केले जात असल्याचा प्रत्यारोप ‘एमआयएम’ने केला आहे. ‘भारत माता की जय’ या घोषणेला एमआयएमचा विरोध नसून हा नारा देण्याची बळजबरी करण्याला आणि त्यावरून देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याच्या पद्धतीला आपला विरोध आहे, असे या पक्षाने स्पष्ट केले आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘भारत माता की जय म्हणा’ असा आग्रह एमआयएमचे मुंबईतील आमदार वारीस पठाण यांनी केला आणि "तुमने जो बोला वही करने का क्या?' असे प्रत्युत्तर पठाण यांनी दिले. त्यावर पठाण यांनी तशा घाेषणा देण्यास नकार दिल्याचा अाराेप सर्वपक्षीय अामदारांनी केला. यामुळे माेठा गदाराेळ निर्माण झाल्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत पठाण यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. यावरून सभागृहाबाहेरही आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
वारिस पठाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करण्याच्या अर्धा तासापूर्वी विधान भवनात असलेल्या टीव्ही कॅमेरा स्टँडजवळ कदम आणि पठाण यांच्यात तब्बल १५ मिनिटे गप्पा रंगल्या होत्या. त्यानंतर सभागृहात जाऊन कदम यांनी पठाण यांना भारत माता की जय म्हणण्याची बळजबरी करणे आणि त्यास पठाण यांनी नकार देऊन खळबळ माजवून दिली, हा केवळ योगायोग नसल्याची चर्चा विधान भवनात रंगली होती.
विरोध नाहीच : जलील
पाकिस्तानची निर्मिती होत असताना महंमद अली जिनांचा द्विराष्ट्र सिद्धांत नाकारून आम्ही भारतातच राहिलो. त्यामुळे आमच्या देशभक्तीवर कुणी शंका घेण्याची किंवा कुणाकडून आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्रे मिळविण्याची गरज नाही, असे एमअायएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. "अाम्ही नेहमीच जयहिंद, भारत झिंदाबाद, हिंदुस्तान झिंदाबाद, जय हिंद हे नारे देतो. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे भारत माता की जय म्हणणारेच देशभक्त असल्याचे ठरवणार असतील तर केवळ ते म्हणतात म्हणून आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही. भारत माता की जय म्हणण्याला तत्त्वत: आमचा विरोध नाही. मात्र, हाच नारा दिला तर तुम्ही देशभक्त असे ठरवणार असेल तर आम्ही ही बळजबरी खपवून घेणार नाही. जय हिंद वा भारत जिंदाबाद या नाऱ्यांमध्ये काय चुकीचे आहे? मुस्लिमांच्या देशभक्तीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रकार आम्ही कितीही वेळा निलंबित झालो तरी खपवून घेणार नाही,' असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘पठाण यांच्या वक्तव्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्व गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत निलंबनाचा प्रस्ताव चर्चेला अाला तेव्हा सभागृहात हा प्रस्ताव पारित करण्यापूर्वी आमची भूमिका गट नेता या नात्याने आपल्याला ठेवण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र न्यायाचे तत्व डावलून ही मागणीही पूर्ण झाली नाही,' असा आरोप जलील यांनी केला.
संघाची एमआयएमला मदत
> ‘आजच भाजपने तिरंगा यात्रा आयोजित केली आहे. त्याच्या अाधीच एमआयएमचे आमदार अशी भूमिका घेतात हा योगायोग नाही. भाजप व एमआयएम यांच्यात हातमिळवणी झाल्याचेच दिसते. संघ व एमआयएम हे मतपेढी मजबूत करण्यासाठी एकमेकाला मदत करीत अाहेत.
जितेंद्र आव्हाड, आमदार राष्ट्रवादी-काँग्रेस
दोन्ही काँग्रेसची खेळी उधळली
> ‘आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीने दलित, मुस्लिमांना आपले गुलाम समजून वागवले. एमआयएमने त्यांच्या या खेळीला उधळून लावल्याने ते आमच्यावर काहीही आरोप करीत आहेत. उलट भाजपसोबत जाऊन त्यांनी आपणच खरे कुणाच्यासोबत आहोत, हे दाखवून दिले आहे.
- इम्तियाज जलील, आमदार एमआयएम
बातम्या आणखी आहेत...