आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Spokes Person Sachin Sawant Attack On CM Fadanvis

संघामुळेच मुख्यमंत्र्यांनी क्रांती दिन टाळला! काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘चले जाव’ चळवळीला संघाचे वैचारिक गुरू गोळवलकर गुरूजी यांचा विरोध होता. त्यामुळेच यंदाच्या ऑगस्ट क्रांती दिनाला मुंबईत हजर राहणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेतुपूरस्सर टाळले, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी साेमवारी केली. संघाचे विचार जपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या कृतीतून हुतात्म्यांचा अवमान झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सावंत म्हणाले, असहकार आंदोलन आणि ‘चले जाव’ चळवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मैलाचे दगड होते. ‘चले जाव’ आंदोलनाला संघाचा विरोध स्वातंत्र्यानंतरही कायम राहिला . २००६ मध्ये तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन यांनी काँग्रेसचे सदर आंदोलन अयशस्वी ठरल्याचे विधान केले होते. गोळवलकर आणि सुदर्शन यांच्या भूमिकांवरून या आंदोलनाप्रति आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी संघाची नकारात्मकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री संघाच्या इशाऱ्यावर नाचणार असतील तर त्यापेक्षा त्यांनी राजीनामा देऊन मोहन भागवत यांनाच मुख्यमंत्री करावे, असा टोलाही सावंत यांनी लगावला.

भाजप सत्तेत आल्यापासून देशातील सर्व महत्वपूर्ण व धोरणात्मक संस्थांमध्ये संघाची विचारधारा घुसविण्याचे षडयंत्र सुरू आहे. विविध शासकीय नियुक्त्यांमध्ये संघांशी संबंधित व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडून बेजबाबदार पद्धतीने कारभार सुरू आहे. शिक्षकांवर संघ विचारांचा पगडा असावा, या हेतूने त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून प्रशिक्षित केले जात आहे. आता शासकीय कर्मचाऱ्यांनाही याच संस्थेतून प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. संघाच्या विचारधारेचा प्रचार- प्रसार करणाया म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यपदी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील असताना या घडामोडी घडतात, हे सूचक असल्याचे ही सावंत म्हणाले.