आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Spokes Person Sachin Sawant Attack On Shivsena

शिवसेनेच्या भूमिकेला मोदींनी लाथाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या पाकिस्तान विरोधाला नरेंद्र मोदी भीक घालणार नाहीत, हे लक्षात आल्यामुळेच शिवसेनेने पाकिस्तानबाबतची तथाकथित आक्रमकता गुंडाळून शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमवारी केली.
भाजपने कधीही शिवसेनेच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला फारशी किंमत दिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिवसेनेने पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीला विरोध केला होता. त्या वेळी राज्यसभेत बोलताना वाजपेयींनी शिवसेना अतिरेक्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे म्हटले होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात शिवसेनेला दहशतवाद्यांपेक्षा अधिक अविश्वासार्ह मानणारा भाजप आता नरेंद्र मोदींच्या काळात शिवसेनेला काय किंमत देणार? याबाबत न बोललेलेच बरे, असे सावंत म्हणाले.
चारच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडण्याची भाषा वापरली होती. तरीही मोदींनी नवाज शरीफ यांना शपथविधीचे निमंत्रण पाठवून शिवसेनेच्या मताला कचर्‍याची टोपली दाखवली. शरीफ यांच्या भारत दौर्‍याबाबत शिवसेनेच्या विरोधाची नरेंद्र मोदी साधी दखलसुद्धा घेणार नाहीत, याची शंभर टक्के खात्री असल्यानेच शिवसेनेने आपला विरोध गुंडाळून झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवली, अशी टिप्पणी सावंत यांनी केली.

‘शिवसेनेच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी अणुबॉम्ब वगैरे फोडतील, अशा वल्गना दोन दिवसांपूर्वी करण्यात आल्या. शिवसेनेची चव्हाट्यावर आलेली अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी मोदींनी अणुबॉम्ब फोडण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा ‘मातोर्शी’वर सुतळी बॉम्ब फोडावेत व त्यातच धन्यता मानावी. हवे असल्यास त्या बॉम्बच्या भीतीने आम्ही मुद्दाम कानावर हात ठेवून शिवसेनेला काहीतरी मोठे काम केल्याचा आनंद मिळवून देण्यात मदत करू,’ असा टोला सावंत यांनी लगावला.