आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress State President Ashok Chavan Comment On CM Devendra Fadanvis Govt.

सरकार ‘संघ दक्ष’; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही : चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरासाठी सरकार सर्वार्थाने कामाला लागल्याचे दिसून येत होते. परंतु याच पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी झटताना दिसून येत नाही. हे सरकार ‘संघ दक्ष’ आहे; मात्र ‘कर्तव्यदक्ष’ नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल, भाई जगताप आणि सतेज पाटील यांचा टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, हा विजय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरणारा आहे.
बिहार, मध्य प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकींचे निकाल भाजपसाठी प्रतिकूल आहेत. दिलेली आश्वासने न पाळल्यामुळे जनतेत भाजपविरोधी वातावरण आहे. या वातावरणाचा लाभ घ्यायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन या सरकारची वस्तुस्थिती लोकांसमोर उघड करा. मागील वर्षभरात महाराष्ट्र कसा अधोगतीकडे गेला, हे लोकांच्या निदर्शनास आणून द्या. ही जबाबदारी कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली तर ‘अच्छे दिन’ आणण्याचे खरे सामर्थ्य भाजपमध्ये नव्हे, तर काँग्रेसमध्येच असल्याची जनभावना निर्माण होईल.
हे सरकार फक्त देखावे करणारे आहे. अलीकडेच केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. एक तर मदत तुटपुंजी दिली. त्यातही प्रचंड उशीर केला आणि वरून ही मदत अभूतपूर्व असल्याच्या गप्पा केल्या जात आहेत. २००८ मध्ये काँग्रेस आघाडीच्या केंद्र सरकारने देशपातळीवर ७२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील सुमारे १५ हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाले. सोबतच माझ्याच नेतृत्वाखालील तत्कालीन राज्य सरकारने ६ हजार २०० कोटी रुपयांचे आणखी एक पॅकेज जाहीर केले.

सरकार स्वत:ची स्तुती करण्यात मग्न
काँग्रेसच्या सरकारांनी एकाच वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे २१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. परंतु, त्याच्या आधारे प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप केला नाही. भाजपच्या सरकारने जेमतेम ३ हजार कोटी रुपये दिले, तर ते स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत, असा हल्लाबोल चव्हाण यांनी केला.