आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष विदर्भातून देण्याची मागणी, हायकमांडकडे लॉबिंग सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गेल्या सात वर्षापासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान असलेल्या माणिकराव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने त्यांची जागी नवा प्रदेशाध्यक्ष देण्याबाबत काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपने मुख्यमंत्रीपदासह अनेक मंत्री विदर्भातून दिल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी पक्षाने नवा प्रदेशाध्यक्ष देताना विदर्भातूनच द्यावा अशी मागणी पक्षातून होऊ लागली आहे. त्यासाठी दिल्लीतील हायकमांडकडे लॉबिंग सुरु झाले आहे.
माणिकराव ठाकरेंनी लोकसभा व विधानसभेत पक्षाचा दारूण पराभव झाल्याने प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते पदावर कायम चिकटून आहेत. तसेच सरकारला वेगवेगळ्या मुद्यांवर घेरण्यात पुढे आहेत. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या प्रश्न असो की आता हिवाळी अधिवेशन असो ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालीच काँग्रेस सरकारला घेरत आहे. त्यामुळे माणिकरावांना प्रदेशाध्यक्षपदात अजूनही रस आहे की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तरीही पक्षात माणिकराव यांच्याऐवजी नव्या दमाच्या नेतृत्त्वाला संधी द्यावी या मतापर्यंत पोहचले आहे. याबाबत काँग्रेस हायकमांडकडेही राज्यातील नेत्यांनी सूचना केल्या आहेत.
नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या रेसमध्ये विदर्भातून नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, कोकणातून नारायण राणे तर पश्चिम महाराष्ट्रातून हर्षवर्धन पाटील यांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी अशीही मागणी एक गटाकडून होऊ लागली आहे. युवक काँग्रेसनेही पृथ्वीबाबांच्या नावाला पसंती दिल्याचे कळते. अभ्यासू, तंत्रकुशल व त्यांच्या स्वच्छ- प्रामाणिक प्रतिमेचा फायदा पक्षाला होईल असाही तर्क पक्षातून मांडला जात आहे. पृथ्वीबाबांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे यासाठी काही नेते राहुल गांधींच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
नारायण राणे प्रदेशाध्यक्षपद घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. मात्र, युती सरकारला नामोहरण करायचे असेल तर राणेंकडे नेतृत्त्व सोपवावे असाही एक प्रवाह आहे. तर, विदर्भातील पक्षाचा आक्रमक व दलित चेहरा नितीन राऊत यांना संधी द्यावी जेणेकरून विदर्भात काँग्रेसला फायदा होईल. विदर्भात दलित लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजपने वेगळा विदर्भ केल्यास काँग्रेसला संजीवनी मिळेल असे गणित राऊतांच्या निवडीमागे सांगितले जात आहे. तर, यापूर्वीचा प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून नवा प्रदेशाध्यक्ष देण्याचाही विचार होऊ शकतो. अशावेळी अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटलांकडे पाहिले जात आहे. हुसेन दलवाई यांच्यावर नावावरही चर्चा सुरु आहे. मात्र, त्यांना जनाधार नसल्याने त्यांचा कितपत विचार होईल याबाबत काँग्रेस नेतृत्त्वाला शंका आहे.