आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Suresh Kalmadi Not Active In Congress Politics

सुरेश कलमाडींपासून कॉँग्रेस चार हात दूरच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी व पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यापासून चार हात दूरच राहण्याचा निर्णय कॉँग्रेसने घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत त्यांना कॉँग्रेसच्या प्रचारात उतरवणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले.
कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याने काँग्रेसचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यामुळे प्रचारातही त्यांची मदत घेतली जाणार नाही. ते वैयक्तिकरीत्या प्रचारात सहभागी झाले तर त्याला काँग्रेस जबाबदार राहणार नाही, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले. कलमाडी यांना ऐन जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जामीन मंजूर झाल्याने त्यांना प्रचारात सामील करून घेता येऊ शकते. त्यांच्या समर्थकांची पुण्यामध्ये मोठी राजकीय ताकदही आहे. पण त्यांना पक्षातून निलंबित केल्याने व त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने माणिकरावांनी सावध प्रतिक्रिया देणे पसंत केल्याचे पक्षातून सांगितले जात आहे. पुण्यात काही कार्यकर्त्यांनी जल्लोष करून कलमाडींच्या सुटकेचे स्वागत केले. त्यावर माणिकराव म्हणाले की तो जल्लोष काँग्रेसचा नव्हता. त्यांच्या समर्थकांचा होता.
दरम्यान, भाजपने कलमाडी यांच्या जामिनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे अनपेक्षित नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कनिमोळी व इतरांप्रमाणे कलमाडी यांनाही जामीन मिळाला. पण त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र सोय झाली. महानगरपालिका निवडणुकीसाठी आघाडीची बोलणी करायला पवारांना आता तिहार जेलमध्ये जावे लागणार नाही, असा टोमणा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला.