आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या धर्तीवर आता काँग्रेसची ‘चौक पे चर्चा’; पुण्यात आज होणार घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशात मीडिया कॅम्पेनचा मोठा वाटा होता. मोदी ब्रँड जनामनात ठसवण्यासाठी भाजपने ‘चाय पे चर्चा‘ कॅम्पेन चालवले होते. काँग्रेसने त्यापासून धडा घेत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकशाही आघाडी सरकारच्या योजना जनतेच्या दारी नेण्यासाठी ‘चौक पे चर्चा’ कॅम्पेन राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीने निर्धार मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे, तर काँग्रेसने विभागवार मेळाव्यांचा चांगलाच धडका लावला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे मेळावे पार पडले आहेत. गुरुवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्राचा विभागीय मेळावा आयोजित केला आहे. त्यात ‘चौक पे चर्चा’ कॅम्पेनची घोषणा करण्यात येणार आहे.

लोकशाही आघाडी सरकारने राज्यात शेकडो लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. मात्र, ते निर्णय आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत आहोत. त्यामुळे एका चांगल्या कॅम्पेनची काँग्रेसला गरज होती, अशी पुष्टी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी ‘दिव्य मराठी’कडे दिली.

सामान्यांचा पक्ष : ठाकरे
काँग्रेस पक्ष मुळात सामान्य माणसांचा आहे. त्यामुळे ‘चौक पे चर्चा’ या कॅम्पेनचा आम्हाला फायदा होईल. आमचे निर्णय आम्ही या कॅम्पेनमार्फत जनतेपर्यंत सहज पोहोचवू, असे मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

भाजपने लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा मोठा वापर केला. त्यापासून काँग्रेसने चांगलाच धडा घेतल्याचे दिसत आहे. अलीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. काँग्रेस आपल्या योजनांच्या प्रचारासाठी एका मोठ्या मीडिया कंपनीला कोट्यवधींंचे कंत्राट देणार असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियाचा वापर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी होते. मोदी यांनी अहमदाबादमध्ये काही काळ चहाचे कँटीन चालवले होते. मोदी ब्रँड जनसामान्यांत नेण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावर ‘चाय पे चर्चा’ कॅम्पेन राबवला होता. त्याचा मोठा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीत झाला. त्याचीच नक्कल ‘चौक पे चर्चा’ या कॅम्पेनमध्ये काँग्रेस करत आहे.