आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Vs Congress In Sindhudurga, Rane Oppeses Mla Sawant\'s Sugar Factory

सिंधुदुर्गात काँग्रेस vs काँग्रेस : राणेंचे ‘उद्योगधंदे’ सावंत चव्हाट्यावर आणणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कणकवली/ मुंबई - काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांच्या मंजूर झालेल्या साखर कारखान्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. आमदार सावंत यांच्या मंजूर झालेल्या साखर कारखान्याची मान्यता रद्द करावी यासाठी राणे यांनी आगपाखड सुरू केल्याने संतप्त झालेल्या विजय सावंत यांनी नारायण राणे यांचे सर्व ‘उद्योगधंदे’ बाहेर आणणार असल्याचे जाहीर केल्याने सिंधुदुर्गात खळबळ उडाली आहे.


आमदार सावंत यांचा कारखाना रद्द करावा यासाठी राणे यांनी साखर आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची डाळ शिजली नाही. त्यामुळे राणे सध्या सावंत यांच्या मागे हात लागले आहेत. मात्र, सावंत यांचे राणेविरोधात आधीच पित्त खवळले असल्याने जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा सावंत यांनी व्यक्त केला आहे.

कणकवली तालुक्यातील शिडवणे गावात सावंत यांचा 70 एकर जागेवर साखर कारखाना उभा राहत आहे. या साखर कारखान्यासाठी 180 कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच हा साखर कारखाना सिंधुदुर्गातील पहिला असणार आहे. याचे श्रेय सावंत याला जाईल यामुळे राणे यांचा जळफळाट वाढला आहे. कारण याच कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात साखर कारखाना उभारण्याची परवानगी राणे यांनी मागितली होती, मात्र विजय सावंत यांनी बाजी मारत परवानगी मिळवल्याने राणे यांची राजकीय हार झाली.

त्यावर राणे यांनी राजकीय कुरघोडी करीत आमदार सावंत यांच्या कारखान्याला परवानगी मिळालीच कशी? सावंत यांनी बेकायदेशीर परवानगी मिळवली आहे. दोन साखर कारखान्यांमधील अंतर सरकारी निकषानुसार नाही, असा सांगत या कारखान्याची परवानगी रद्द करावी, यासाठी राणे यांची धडपड सुरु आहे.

या सर्व प्रकारामुळे आमदार सावंत भडकले असून राणे यांच्यावर प्रहार करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असे संकेत दिले. ते म्हणाले, राणे यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्याने असे वागणे योग्य नाही. त्यांचा हा कुरघोडीचा प्रताप असाच चालू राहिला तर आपणही राणे यांचा भांडाफोड करु. राणे यांनी आपला साखर कारखाना उभा राहावा यासाठी काय काय उद्योग केले याबाबतचा खुलासा आपण येत्या रविवारी पत्रकार परिषद घेऊन करू, असेही आमदार सावंत यांनी सांगितले.