आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Want Small Irragation Project From Nationalist

पुन्हा खेचाखेची: काँग्रेसकडील जलसंधारण विभागाला हवेत राष्‍ट्रवादीकडील लघुसिंचन प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे असलेल्या जलसंपदा विभागातील लघु सिंचनाच्या प्रकल्पांवरे काँग्रेसकडील जलसंधारण विभागाचे मंत्री नितीन राऊत यांचा डोळा आहे. हे प्रकल्प आपल्या खात्याकडे घेण्यासाठी त्यांनी एक प्रस्तावही तयार केला आहे. तो मंजूर झाल्यास 1,000 हेक्टर क्षेत्रफळापर्यंतचे सिंचन प्रकल्प जलसंधारण विभागाकडे येऊन त्या विभागाचे बजेटही वाढले, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, हा प्रस्ताव
जलसिंचन विभागाला मान्य नसून क्षेत्रफळ वाढवून देण्यास त्यांनी विरोध असल्याची माहिती विभागातील वरिष्ठ अधिका-याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


जलसंधारण विभागातर्फे सध्या शून्य ते 250 हेक्टर क्षेत्रफळाचे जलसिंचन प्रकल्प राबवले जातात तर त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाचे प्रकल्प जलसिंचन विभागातर्फे राबवले जातात. आता 250 हेक्टर ते 1,000 हेक्टरपर्यंतचे लघु प्रकल्प जलसंधारण विभागाकडे द्यावेत, असे प्रस्तावात म्हटले आहे. असे झाल्यास सध्या केवळ 50 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असलेल्या जलसंधारण विभागाचे बजेट वाढून 700 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज जलसंधारण विभागातर्फे वर्तवला जात आहे. तसेच केंद्र सरकारच्या वेगवर्धित सिंचन योजनेचा लाभही जलसंधारण विभागाला होऊ शकतो. त्यासाठी तांत्रिक बाब म्हणून जलसंपदा विभागातील ‘सूक्ष्म सिंचन’ हा भाग ‘लघु सिंचन’ असे नाव बदलून जलसंधारण विभागात आणावा, असे प्रस्तावात म्हटले आहे. या प्रस्तावाला आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेने अशा स्वरूपाची शिफारस दिल्याचे सांगितले जात आहे.


हजार हेक्टरची मर्यादा अमान्य
जलसंधारण विभागाच्या या प्रस्तावाला जलसंपदा विभागाचा विरोध आहे. 1,000 हेक्टर पर्यंत लघु सिंचन प्रकल्पांची घातलेली मर्यादा त्यांना मान्य नसल्याचे संंबंधित अधिका-याने सांगितले. केवळ राजकीय सोयीसाठी जलसंधारण आणि जलसंपदा विभाग वेगळे करण्यात आले होते. तसेच या प्रस्तावामुळे काही प्रकल्प लवकर होणार असतील तर ठीक, अन्यथा केवळ तांत्रिक बाबींमध्ये वाढ होईल, असे संबंधित अधिका-याचे म्हणणे आहे.


राष्‍ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न
सिंचन भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी पेचात पकडण्यासाठी काँग्रेसने हा प्रस्ताव बनवला आहे. त्यामुळेच राज्यातील दुष्काळादरम्यान सिमेंट बंधारे बांधण्याचे काम जलसंधारणाने हाती घेतले. या बंधा-यांमुळे काही दुष्काळी भागांना फायदाही झाला, पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मोठ्या धरणांऐवजी असे बंधारे बांधणे कसे किफायतशीर आणि कमी वेळेचे काम असल्याचे सांगत पुन्हा एकदा राष्ट्रवादीविरोधात छुपी आघाडी उघडली. तसेच असे बंधारे बांधण्यासाठी जलसंधारण विभागाला आर्थिक प्रोत्साहनही दिले, पण त्याचवेळी मोठ्या धरणांचे फायदे दुर्लक्ष करून चालणार नाहीत हे ते सोयीस्कररीत्या विसरले. या आघाडीतील वादातूनच पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचण्यासाठी हा प्रस्ताव आणल्याचे बोलले जाते.


प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे
हा प्रस्ताव आपण सही करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. सिंचन अनुशेषामुळे राज्यपालांच्या निर्देशानुसार जलसिंचन विभागाला सर्व प्रकल्पांना न्याय देता येत नाही. लघु सिंचनाचे प्रकल्प आमच्याकडे आले तर ते लवकरात लवकर पूर्णत्वास नेऊ. नितीन राऊत, जलसंधारण मंत्री


जलसंधारण विभागाचा हा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही. तो आल्यावर दोन्ही विभाग त्यावर चर्चा करतील व मगच निर्णय घेऊ.
सुनील तटकरे, जलसंपदा मंत्री