आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेक्युलर’ या शब्दासाठी बाबासाहेब आग्रही नव्हतेच : संविधानतज्ज्ञ कश्यप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून मोदी सरकारने संसदेत घडवलेल्या चर्चेत ‘सेक्युलर’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? आणि बाबासाहेबांना संविधानाच्या सरनाम्यात ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे दोन शब्द जोडणे अपेक्षित होते की नव्हते? याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने संविधानाचे इतिहासतज्ज्ञ सुभाष कश्यप, डॉ. नरेंद्र जाधव, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, उल्हास बापट आणि विनय सहस्रबुद्धे यांची मते जाणून घेतली. त्याचा हा वृत्तांत त्यांच्याच शब्दांत...
संविधानाचे अभ्यासक सुभाष कश्यप यांच्या मते, संविधान तयार करताना डॉ. आंबेडकरांनी कधीही ‘सेक्युलरिझम’ या शब्दाचा अंतर्भाव करण्याची सूचना किंवा मागणी केली नाही. उलट विरोधच केला. भावी पिढ्यांना कोणत्याही ‘इझम’ला बांधून ठेवू इच्छित नाही, असे आंबेडकर म्हणाले होते. एवढेच नव्हे तर पंडित नेहरू, सरदार पटेल, के. एम. मुन्शी, अल्लादी अय्यर अशा सदस्यांचाही या सूचनेला िवरोध होता. याचा अर्थ संविधानाचे स्वरूप धर्मनिरपेक्ष नाही असे नव्हे. आपले संपूर्ण संविधान धर्मनिरपेक्षच आहे. सरकारचा स्वत:चा धर्म नसेल हे संविधानात स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे अनुकरण करण्याचे स्वातंत्र्य असेल, हा मूलभूत अधिकारही त्यात नमूद आहे.
राज्यघटनेतील शब्दांच्या हिंदी भाषांतराबाबत अभ्यासकांमध्ये विविध मतप्रवाह
भाषांतरित शब्दाला अद्याप मान्यताच नाही : सहस्रबुद्धे
भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या मते, सेक्युलर शब्दातून मुस्लिमांना पाठबळ असल्याचे काँग्रेसने भासवले. याचे भाषांतर ‘धर्मनिरपेक्ष’ करून टाकले, परंतु या शब्दाला अद्याप अधिकृत मान्यता नाही. १९७६ मध्ये सेक्युलर शब्दाचे हिंदी भाषांतर काय असावे, हा विषय लोकसभेत आला तेव्हा ते ‘पंथ निरपेक्ष’ असे करण्यात आले. १९७८ मध्ये लोकसभेत या शब्दाला मंजुरी मिळाली; परंतु राज्यसभेत हा शब्द कायमचा अडला. तो मंजूर झाला असता तर ‘सर्वधर्म समभाव’ असे न म्हणता ‘सर्व पंथ समभाव’ व ‘पंथ निरपेक्ष’ असे शब्द रूढ झाले असते, परंतु कॉंग्रेसला यावरून राजकारण करायचे असल्याने या शब्दाला मान्यता मिळू दिली नाही. त्यामुळे आजही हा शब्द ‘सेक्युलर’ असाच आहे.
सरकारकडून शब्दाची अधिकृत व्याप्ती व्हावी : डॉ. नरेंद्र जाधव
राज्यघटनेचे अभ्यासक डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मते, डॉ. आंबेडकरांना सेक्युलर राज्यच अपेक्षित होते. याचा अर्थ त्यांनी ‘सर्वधर्म समभाव’ किंवा ‘धर्मनिरपेक्ष’ असाच काढला होता; परंतु घटनेत तो शब्द प्रकट होऊ शकला नाही. त्यांनी पंडित नेहरूंना ‘तुम्ही समाजवादी आहात, सेक्युलॅरिझम असलेला देश अशी ओळख का होऊ देत नाही?’ असा प्रश्न केला होता. त्यावर नेहरूंनी ‘मी समाजवादी असलो तरी सरकार समाजवादाशी बांधून ठेवण्याच्या विरोधात आहे. येणारे सरकार भिन्न विचाराचे असू शकते. अशावेळी त्यांना मुक्तपणे काम करता आले पाहिजे,’ असे सांगितले होते. परंतु ‘धर्म निरपेक्ष’ व ‘पंथ निरपेक्ष’ याचे अर्थ आजही स्पष्ट नाहीत, त्याची व्याप्ती सरकारकडून अधिकृतपणे व्हायला पाहिजे.’
धर्मनिरपेक्षता हे तर मूलभूत तत्त्वच : चपळगावकर
माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या मते, ‘राज्यघटनेच्या सरनाम्यात सेक्युलर आणि सोशालिस्ट (समाजवादी) हे शब्द जोडण्याची सूचना घटना समितीचे सदस्य के. सी. शहा यांनी केली होती. मात्र, या सूचनेला नेहरू आणि आंबेडकरांनी विरोध केला. उद्या दुसऱ्या विचारांचे सरकार आले, तर त्यांच्यावर हे विचार लादले जाऊ नयेत, अशी भूमिका या दोघांनी मांडली हाेती. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये स्पष्ट केले आहे.’
धर्मनिरपेक्षता शब्द जोडणे योग्य निर्णय : उल्हास बापट
राज्यघटनेच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक उल्हास बापट यांच्या मते, ‘घटना तयार करताना डॉ. आंबेडकरांनी सेक्युलर शब्द जोडण्याची मागणी वा मत कुठेही व्यक्त केलेले नाही. मात्र, सरनाम्यात हा शब्द जोडण्यात काहीही चुकीचे नाही. घटना प्रवाही आहे. त्यात सरकार बदल करत असते. तसेच सेक्युलर या शब्दाचे "धर्मनिरपेक्षता' भाषांतर योग्य आहे. आपली घटना धर्मनिरपेक्ष आहे याची जाणीव लोकांना करून देण्यासाठी झालेली ४२ वी घटनादुरुस्ती योग्य आहे, असे मत नानी पालखीवाला यांनी नोंदवले आहे. या घटनादुरुस्तीतून सरनाम्यात केवळ सेक्युलर किंवा सोशालिस्ट हे शब्दच जोडण्यात आले नाहीत, तर "युनिटी' व "इंटेग्रिटी' हे शब्दही जोडले. घटनेचा आत्माच धर्मनिरपेक्षता असल्याने हा वाद उकरून काढणे चुकीचे आहे.’