आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरातील व्यंगचित्रकारांचे 20, 21 जानेवारीला संमेलन; विवेक मेहेत्रे संमेलनाध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कार्टुनिस्ट कंबाइन या व्यंगचित्रकारांच्या संस्थेच्या वतीने ठाणे येथे २० व २१ जानेवारीला व्यंगचित्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रख्यात व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. संमेलनात प्रथमच महिला व्यंगचित्रकार घडवण्यासाठी विशेष कार्यशाळा होणार आहे. 


ठाणे येथील महानगरपालिकेच्या सभागृहांमध्ये या व्यंगचित्र संमेलनाचे विविध कार्यक्रम होतील. या वेळी “सोशल मीडिया व व्यंगचित्रे’, ‘मराठी दैनिकांचे संपादक राजकीय व्यंगचित्रे प्रसिद्ध करायला घाबरतात काय?’ या दोन विषयांवर परिसंवाद होणार असून त्यात मराठी दैनिकांचे संपादक तसेच व्यंगचित्रकार सहभागी होतील. यात तीन कार्यशाळांही होतील.

 

देशभरातील दैनिक, नियतकालिकांमधून काम करणाऱ्या व्यंगचित्रकारांची १३० इतकीच संख्या असून त्यात केवळ दोनच महिला आहेत.  त्यामुळे महिला व्यंगचित्रकारांची संख्या वाढावी यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता ठाण्यातील व्यंगचित्र संमेलनात महिला व्यंगचित्रकारांसाठी एक खास कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे. मुलांना व्यंगचित्रे चितारण्याची गोडी लागावी,  यासाठी व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवले जाणार अाहे. यात दीडशेहून अधिक व्यंगचित्रे असतील. या संमेलनात देशभरातून १००हून अधिक व्यंगचित्रकार उपस्थित राहाणार आहेत.   


शिवसेनाप्रमुखांसह तिघांनी केली कार्टुनिस्ट कंबाइन संघटनेची स्थापना  
कार्टुनिस्ट कंबाइन ही संघटना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वसंत हळबे व विवेक मेहेत्रे यांनी १९८२ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या वतीने त्यानंतर दरवर्षी विविध ठिकाणी व्यंगचित्रकार संमेलनाचे आयोजन केले जाते. ठाणे येथे यंदाच्या वर्षी होणाऱ्या व्यंगचित्रकार संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले विवेक मेहेत्रे हे गेल्या ३८ वर्षांपासून विविध दैनिक, नियतकालिकांत व्यंगचित्रे चितारत आहेत. तसेच त्यांनी कॉमिक्ससाठीही चित्रे काढली आहेत. ते पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून सक्रिय असून त्यांनी आजवर साठ हजारांहून अधिक व्यंगचित्रे काढली आहेत.

बातम्या आणखी आहेत...