आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स-एमएमआरडीए मेट्रो-२ चा करार रद्द, १६० कोटींची बँक गॅरंटी परत करावी लागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - घाटकोपर-वर्सोवा मेट्रोनंतर मुंबईत चारकोप-वांद्रे-मानखुर्द असा मेट्रो-२ चा टप्पा सुरू करण्यात येणार होता. १२००० कोटी रुपयांचा हा प्रकल्पही रिलायन्सलाच २००९ मध्ये देण्यात आला होता, परंतु आता खर्चात वाढ झाल्याने एमएमआरडीए आणि रिलायन्सने सहमतीने सवलत करार रद्द केला आहे. करार रद्द झाल्याने रिलायन्सने एमएमआरडीएला दिलेली १६० कोटी रुपयांची बँक गॅरंटी परत करावी लागणार असून नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत.
आघाडी सरकारच्या काळात मेट्रो-२ साठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात रिलायन्सची निविदा मान्य झाली. १२००० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ऑगस्ट २००९ मध्ये झाले होते. मात्र चार वर्षानंतरही रिलायन्स काम सुरु करू शकले नव्हते. डेपोसाठीची जागा सीआरझेडमध्ये येत असल्याने केंद्रीय पर्यावरण विभागाने त्याला मंजुरी दिली नव्हती तसेच विमानतळाच्या हद्दीतून मेट्रो जाणार असल्याने बांधकामाच्या उंचीवर एअरपोर्ट अॅथॉरिटीने आक्षेप घेतला होता.
करार रद्द करण्याबाबत रिलायन्सने प्रसिद्धीपत्रक काढले असून त्यात प्रकल्पासाठी विविध परवानग्या आवश्यक असून महाराष्ट्र सरकारने पुरेपूर प्रयत्न करूनही त्या न मिळाल्याने सवलत करार रद्द करीत असल्याचे म्हटले आहे. जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प भूमिगत करीत दहिसरपर्यंत नेता येईल का याबाबतचा अहवाल देण्यासाठी राईट्स संस्थेला काम दिले होते. या संस्थेचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय प्रकाश जावडेकर यांच्याशी रिलायन्स आणि एमएमआरडीएच्या अधिका-यांची बैठक झाली. त्यातही मेट्रो-२ बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतरच हा िनर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

निर्णय सहमतीनेच
एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सवलत करार रद्द झाल्याचे मान्य करून, हा सवलत करार एकमेकांच्या सहमतीने रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केलेे. मुंबई मेट्रो ट्रान्सपोर्ट प्रा. लि. तर्फे बँक गॅरंटी परत मिळण्यासाठीचे पत्र अजून प्राप्त झालेले नसून ते मिळताच बँक गॅरंटी परत करण्याच्या अनुषंगाने ताबडतोब पावले उचलली जातील, असे सांिगतले.