आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्यात विशेष तपास पथके, महासंचालकांचा आदेश वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुन्हे निष्पन्न होण्याचा वेग वाढवण्यासाठी आता राज्यभरातील सगळ्या पोलिस ठाण्यांत एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, नियमित गस्त यासारख्या कामातून वगळण्यात येणार आहे. दोन वर्षे किंवा त्यावरील कालावधीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास या पथकामार्फत करण्यात येणार आहेत. मात्र अगोदरच अपुऱ्या पोलिस बळामुळे दैनंदिन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासनाला अनंत अडचणी येत असताना या वेगळ्या पथकांसाठी कर्मचाऱ्यांची तरतूद कशी करायची, असा प्रश्न अधिकारी वर्गाला पडला आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी दोनच दिवसांपूर्वी याबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना जारी केले आहेत. येत्या एक जुलैपासून अशी विशेष तपास पथके स्थापन करून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे आदेश पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलिस प्रशासन आणि जीआरपी म्हणजेच राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रेल्वे पोलिस विभागांना लागू असणार आहेत. पथकात नियुक्ती झालेल्या पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्याला बंदोबस्त, गस्त, स्टेशन ड्यूटी अशा कटकटीच्या कामांपासून मुक्ती मिळणार आहे. याशिवाय अन्य कोणत्याही तपासाची जबाबदारी या पथकातील कर्मचाऱ्यांवर नसणार आहे. राजद्रोह, खून, दरोडा, जबरी घरफोडी, महिला अत्याचाराशी संबंधित सर्व गुन्हे, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि आयटी अॅक्ट अंतर्गत येणारे गुन्हे यासारख्या गुन्ह्यांचा गंभीर गुन्ह्यांच्या यादीत समावेश होतो.

"निर्णय रद्द'ची टांगती तलवार
पुरेशा मनुष्यबळाअभावी या तपास पथकात नियुक्त्या करणे कठीण हाेईल, म्हणून बहुतांश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र तरीही हा आदेश लागू केल्याने पोलिस दलात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. सध्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांच्या निवृत्तीला अवघे दोन महिने शिल्लक असून त्यांच्या निवृत्तीनंतर नवे पोलिस महासंचालक हा निर्णय रद्द करतील अशी बोलकी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

आवश्यक मनुष्यबळ
मुंबई शहरात एकूण ९१ पोलिस ठाणी असून त्यात अशा पथकांच्या स्थापनेसाठी ५४२ पुरुष आणि १४९ महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकारी आवश्यक असून उर्वरित महाराष्ट्रात एकूण ९७९ पोलिस ठाणी आहेत. त्यासाठी ४ हजार ९९३ पुरुष आणि १ हजार ३९१ महिला पोलिस कर्मचारी आवश्यक असणार आहेत.

कसे असेल हे पथक ?
या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षकाकडे असेल. या शिवाय या पथकात एक सहाय्यक उपनिरीक्षक किंवा हवालदार आणि काही शिपाई असतील. ठाण्यांमधील गंभीर गुन्ह्यांच्या नोंदीनुसार प्रत्येक ठाणे हे अ, ब, क आणि ड अशा चार गटात विभागले जाणार आहे. एखाद्या ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्यास एकापेक्षा अधिक पथकेही स्थापन करण्याची मुभा ठाण्याच्या प्रमुखाला असेल.पोलिस ठाण्याची वर्गवारी आणि अधिकची विशेष तपास पथके नेमण्याचा निर्णय कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक त्या विभागाचेपोलिस आयुक्त किंवा पोलिस अधिक्षकाच्या शिफारसींच्या आधारे घेतील.

पथकातील नियुक्तीचे निकष आणि कालावधी
पथकात नियुक्तीनंतर कर्मचाऱ्याला कमाल दोन वर्षे काम करता येईल. या कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्यास त्याच ठाण्यात आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. मात्र कामगिरी असमाधानकारक असल्यास, अप्रामाणिकपणा आणि लाचखोरी असे आरोप झाल्यास कर्मचाऱ्याची पथकातून गच्छंती केली जाणार आहे. गच्छंती झाल्यास पुढची तीन वर्षे त्याला या पथकात काम करता येणार नाही. विशेष तपास पथकातील नियुक्तीसाठी पुढील निकष असतील :
{ कर्मचारी, अधिकाऱ्याची जनमानसातील प्रतिमा चांगली असावी.
{ त्याचा गुन्हे तपासातील अनुभव आणि पूर्वकामगिरी उत्तम असावी
{ तपासाची विशेष खुबी आणि कायद्याचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
{ विशेष शैक्षणिक अर्हता असलेल्यांना प्राधान्य.
बातम्या आणखी आहेत...