आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात हंगामा : स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या अणे‘वाणी’ने वादाला ताेंड!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कायम वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे आता वेगळ्या मराठवाड्याच्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. जालना येथील कार्यक्रमात अणेंनी केलेल्या स्वतंत्र मराठवाड्याबद्दलच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख विरोधी पक्ष आणि सत्ताधारी शिवसेनेनेही अणेंच्या हकालपट्टीची मागणी केली. या मागणीसाठी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदार हौद्यात उतरल्यामुळे झालेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज अगोदर पाच वेळा आणि शेवटी दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

जालना येथे मराठवाडा मुक्ती मोर्चाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अणेंनी स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीचे बिगुल फुंकले होते. त्यावरून सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी नियम २३ अंतर्गत विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे एक प्रस्ताव सोपवून अणेंना महाधिवक्तापदावरून हटवण्याची मागणी केली. प्रस्तावावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि सपचे अबू आझमी यांचा समावेश आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणेंच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही अणेंच्या वक्तव्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्या अणेंना कोणाचा पाठिंबा आहे, याचा एकदा खुलासा झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि गुलाबराव पाटील यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत अणेंच्या हकालपट्टीची मागणी केली. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांना भेटून अणेंच्या हकालपट्टीचा ठराव पारित करण्याची मागणी केली. घटनेच्या कलम १६५चा भंग अणेंनी केल्याचेही वळसे म्हणाले. सभागृहाच्या भावना पाहता संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सर्व पक्षिय गटनेत्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने सर्व सदस्य हौदात उतरले आणि त्यांनी अणेंच्या विरोधात घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यानंतर तब्बल पाच वेळा कामकाज तहकूब करण्यात आले.
काय म्हणाले होते अणे?
विदर्भापेक्षाही मराठवाड्यावर जास्त अन्याय झाला असून विदर्भाबरोबरच मराठवाडाही स्वतंत्र राज्य झाले पाहिजे. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील जनतेने संघर्षाची तयारी ठेवावी, असे वक्तव्य अणेंनी जालन्यातील मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या कार्यक्रमात केले हाते.

वादाचे अणे
> मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये अणेंनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर जनमत चाचणी घेण्याचे आवाहन केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला हाेता.
> स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही, असे वक्तव्य अणेंनी १४ जानेवारी रोजी नागपुरातील कार्यक्रमात केले होते.
> शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारी यंत्रणेला अपयश येत अाहे. वातानुकूलित कार्यालयात बसून विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दु:खाच्या झळा कशा कळणार, असे वक्तव्य अणेंनी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान १६ फेब्रुवारी रोजी केले होते.
> फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर श्रीहरी अणे यांची ऑक्टोबर २०१५ मध्ये महाधिवक्तापदी नियुक्ती केली हाेती.

भाजप खासदार गायकवाडांचा मात्र अणेंच्या भूमिकेला पाठिंबा
लातूर | सर्वचजण अणेंच्या भूमिकेवर तुटून पडलेले असतानाच लातूरचे भाजप खासदार
सुनील गायकवाड यांनी मात्र अणेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर मागच्या बुधवारी त्यांनी आणि लातूरच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच या संस्थेने थेट पंतप्रधान कार्यालयाकडे स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या मागणीचा प्रस्तावही पाठवून दिला आहे.

अणेंच्या वक्तव्यामागे कोण आहे? ज्यांनी त्यांची नियुक्ती केली तेच लोक तर त्यांच्या या वक्तव्यामागे नाहीत ना? हे महाराष्ट्रातील जनता जाणून घेऊ इच्छिते.
- दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
स्वतंत्र विदर्भानंतर अणेंनी स्वतंत्र मराठवाडा राज्याचे समर्थन केले आहे. उद्या ते वेगळा खान्देश आणि नंतर वेगळ्या मुंबई राज्याचीही मागणी करतील. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
- धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

हा अभूतपूर्व प्रसंग अाहे. कायदेशीर सल्ला देण्यासाठी सरकारने नेमलेले महाधिवक्ते अशी मागणी कशी करू शकतात?
- गणपतराव देशमुख, ज्येष्ठ विधानसभा सदस्य
बातम्या आणखी आहेत...