आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ज्यांनी राज्यातील सहकारी संस्था बुडवल्या तेच नेते आज साखर कारखान्यांचे मालक झाले'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ज्यांनी राज्यातील सहकारी संस्था बुडवल्या तेच नेते आज साखर कारखान्यांचे मालक झाले आहेत. या नेत्यांनी केलेले कारखान्यांचे लिलाव म्हणजे शेतकरी-कामगारांच्या घरांवर दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे,’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांचा समाचार घेतला.
सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीला विरोध करण्यासाठी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या वेळी शेट्टी म्हणाले की, राज्यातील 40 कारखान्यांची विक्री झाली असून ते सर्व व्यवहार संशयास्पद आहेत. गिरणा कारखान्यांची किंमत 200 कोटी असताना छगन भुजबळ यांनी तो 27 कोटींना विकत घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातील लूट भुजबळांनी ‘गिरणा’त ओतली आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. शेट्टी यांना कारखान्यातले काय कळते, या अजित पवारांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ‘अजित पवार सहा खासगी कारखाने चालवतात, मी मात्र सहकाराच्या मार्गाने 50 कारखाने त्यांना चालून दाखवणार आहे.’, असे आव्हान शेट्टी यांनी स्वीकारले.


आझाद मैदान गहिवरले
मी 45 वर्षे आंदोलनात आहे. परंतु, एवढी धोकाधाढी कधीच पाहिली नाही. कारखान्याच्या विक्री घोटाळ्याची लढाई शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची हजारे यांनी घोषणा करताच आझाद मैदानातील आंदोलकांची मनेही हेलावली.
या मोर्चात ऊस उत्पादक शेतक-यांपेक्षा कामगारांची उपस्थिती मोठी होती. नाशिक जिल्ह्यातील गिरणा कारखान्यांचे कामगार मोठ्या प्रमाणात होते. विशेष म्हणजे मोर्चाचे आयोजक असणा-या फेडरेशनचे अध्यक्ष आणि राष्टÑवादीचे जेष्ठ नेते गोविंदराव आदिकच या आंदोलनाला उपस्थित नव्हते. जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असे अण्णांनी यावेळी आंदोलकांना बजावले. अण्णा मोर्चात असल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळपासून मैदानावर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा ठेवला होता.


अजित पवार हे तर सहकारातील ‘जादूगार’
पाच वर्षांपूर्वी कारखान्यात कारकून असणारे आज सहा-सहा कारखान्यांचे मालक झाले आहेत. त्यांना जिल्हा बँकांनी 600 कोटींपर्यंत कर्जे दिली आहेत, असा आरोप करतानाच अजित पवार सहकारातले मोठे जादूगार आहेत, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला.


स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करा : पाटकर
40 कारखाने विक्रीच्या चौकशीसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे, अशी मागणी मेधा पाटकर यांनी केली. मंत्रिमंडळाचा विरोध डावलून कारखान्यांची विक्री करणा-या राज्य बँकेचा निर्णय आम्हाला नामंजूर आहे, असे माजी आमदार माणिक जाधव म्हणाले.