आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperative Minister Harshwardan Patil\'s Factory On Village

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कारखाना गावक-यांच्या मुळावर ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील आष्टीत (ता. मोहोळ) उभ्या राहत असलेल्या खासगी साखर कारखान्यामुळे उद्भवणा-या प्रदूषणातून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे, असा आरोप कारखान्याच्या बांधकामास हरकत घेणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री व इतर नातेवाईक या कारखान्याच्या संचालक मंडळावर आहेत.

आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली. आष्टी येथे औदुंबरराव पाटील साखर कारखाना उभारण्यात येत आहे. त्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. परिसरातील पंचवीसहून अधिक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, या साखर कारखान्याची मळी, सांडपाणी व इतर प्रदूषणकारी पदार्थ पाण्यात मिसळून ते प्रदूषित होण्याची भिती आहे. यातून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही उद्भवेल. तसेच, पर्यावरणाच्या नासाडीमुळे येथील 200 जातींच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या साखर कारखान्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालानंतर प्रदुषण मंडळाने तब्बल सहा महिन्यांनंतर कारखान्याच्या जागेची हवाई पाहणी करून मागील वर्षी 31 जानेवारीला या कारखान्याला ‘एरियल डिस्टन्स सर्टीफिकेट’ देण्यात आले. पण, ते प्रमाणपत्र दुस-या च जागेसाठी देण्यात आले होते. मुंबई जमीन कायद्यानुसार शेतजमिनीवर औद्योगिक उत्पादन करता येत नाही. मात्र या कारखान्यासाठी जमीन बिगरशेती करण्याची प्रक्रियादेखील राबवण्यात आलेली नाही.

ग्रामपंचायतचा ठराव धाब्यावर
ग्रामपंचायतीने विरोध करूनही त्या ठरावाला न जुमानता या कारखान्याने बांधकामाचे घोडे पुढेच दामटले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या वजनदार नेत्याचा या कारखान्याशी निकटचा संबंध असल्यामुळेच राज्य सरकार व इतर सरकारी यंत्रणा तक्रारींची गंभीरपणे दखल घेत नसल्याचा आरोप याचिकेत आहे. त्यावर न्यायालयाने राज्य शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कारखान्याला नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.