आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 डिसेंबरपूर्वी पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा; सहकार मंत्र्यांच नवीन डेडलाइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार बांधील असून ऑनलाइन अर्जांमध्ये कसलाही गोंधळ वा गडबड झालेली नाही. अर्जांची योग्यरीत्या तपासणी सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून २५ नोव्हेंबरपर्यंत ७५ टक्के शेतकऱ्यांची यादी पूर्ण होऊन १ डिसेंबरपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल,’ अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.   


कर्जमाफीची प्रक्रिया अाम्ही पाच महिन्यांत पूर्ण करीत आहोत. मागील सरकारला कर्जमाफी पूर्ण करण्यास ११ महिने लागले होते. त्या वेळेस बँकांनी यादी दिली आणि सरकारने पैसे  दिले. मात्र ते पैसे खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यात गेले का, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही मात्र प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार आहोत. त्यामुळेच आधार क्रमांकाशी कर्जमाफीचा अर्ज जोडला जात आहे. आलेले अर्ज आणि बँकांनी दिलेली यादी याची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. यामुळे खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे शक्य होणार आहे, असे देशमुख म्हणाले.   


‘सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाला त्यामुळे अाजवर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यातच आता आयटी विभागाचे सचिव रजेवर गेले आहेत. असे असताना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी कशी होईल?’ या प्रश्नावर देशमुख म्हणाले, ‘सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ वगैरे काहीही झालेला नाही. आयटी सचिव खासगी कामासाठी रजेवर गेेलेले आहेत. मात्र त्यामुळे प्रक्रियेवर परिणाम हाेणार नाही. अर्ज तपासणीचे काम योग्यरीत्या युद्धस्तरावर सुरू आहे आणि थोड्याच दिवसांत तुम्हाला परिणामही दिसतील. ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांचे आधार कार्ड बनवून घेतले जात आहे. आधार कार्ड त्वरित तयार होत असल्याने ज्यांच्याकडे नाही त्यांना कर्जमाफी देण्यात कसलीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   


कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात दीड लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला जाणार असून त्यानंतर प्रोत्साहन रक्कम देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...