आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperative Minister\'s Wife Factory Construction Stayed By High Court

सहकार मंत्र्यांच्या पत्नीच्या कारखाना बांधकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आष्टी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे उभ्या राहत असलेल्या औदुंबरराव पाटील खासगी साखर कारखान्याच्या बांधकामाला उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री व त्यांचे इतर नातेवाईक या कारखान्याच्या संचालक मंडळावर आहेत.


आष्टीत ज्या ठिकाणी हा कारखाना उभारण्यात येत आहे, त्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. आष्टीसह परिसरातील 25 गावे पाण्यासाठी या तळ्यावर अवलंबून आहेत; परंतु तळ्याशेजारीच हा साखर कारखाना उभारण्यात येत असल्यामुळे कारखान्याचे सांडपाणी, मळी व इतर प्रदूषणजन्य पदार्थ पाण्यात मिसळून हे तळे दूषित होईल. यातून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका पोहोचणार आहे.


कारखान्याने अनेक नियमांची पायमल्लीदेखील केली असून त्याला कुठल्याही प्रकारच्या परवानग्या देण्यात आलेल्या नाहीत. ज्या जागेची हवाई पाहणी करून कारखान्याला एरियल डिस्टन्स सर्टिफिकेट देण्यात आले होते, त्या जागेऐवजी भलत्याच जागेवर हा कारखाना उभारण्यात येत आहे. ही धक्कादायक बाब महसूल विभागाच्या पाहणीतून उघड झाली.


कारखाना उभारण्यापूर्वी त्याची जमीन बिगरशेती म्हणून जाहीर करण्याची प्रक्रियादेखील राबवण्यात आलेली नाही. तसेच, कारखान्याच्या उभारणीला परवानगी देण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने ग्रामपंचायतीला असतात. परंतु, कारखाना उभारणीविरोधात आष्टी ग्रामपंचायतीने ठराव केलेला असतानादेखील कारखान्याचे काम सुरू आहे, असे आष्टी ग्रामपंचायतीने आपल्या याचिकेत नमूद केले आहे.


परवानग्याच नाहीत
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी सकृतदर्शनी कारखान्याच्या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळवल्या नसल्याचे मत व्यक्त करत न्यायालयाने बांधकामाला 30 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली.