आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना महामंडळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात दरवर्षी होणार्‍या 71 हजार रस्ते अपघातांमध्ये 12 हजार प्रवाशांचा हकनाक बळी जातो. या वाढत्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठीच रस्ते अपघात उपाययोजना महामंडळाची निर्मिती करण्याचा शासनाचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर लवकरच सादर केला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

महाराष्ट्रासारख्या उद्यमशील राज्यात 4 हजार 376 कि. मी. लांबीचे 16 राष्ट्रीय महामार्ग, तर 34 हजार 102 कि.मी. लांबीचे 291 राज्य महामार्ग आहेत. या रस्त्यांवर आजमितीस 17 कोटी 43 लाख 40 हजार वाहने धावतात. गेल्या पाच वर्षांत राज्यातील अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले असून दरवर्षी सरासरी 71 हजार अपघात होतात. अशाप्रकारच्या अपघातांमध्ये दरवर्षी 12 हजार प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विविधप्रकारच्या अपघातांच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रस्ते अपघात महामंडळाची निर्मिती करणे आवश्यक आहे.
समन्वय समितीचा मसुदा लवकरच तयार होणार
मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात रस्ते अपघातांवर सविस्तर चर्चा झाली होती. रस्ते अपघातांवर उपाययोजना करण्याचे वचन त्या वेळी शासनाने दिले होते. त्यानुसार ऑक्टोबर 2012 मध्ये एका विधिमंडळ समन्वय समितीची स्थापना झाली.

बांधकाम, गृह, आरोग्य आणि परिवहन विभागाच्या मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश असून गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील समितीचे अध्यक्ष आहेत. आजपर्यंत समन्वय समितीच्या चार बैठका झाल्या असून रस्ते अपघात रोखण्यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे. समन्वय समितीची अंतिम बैठक पुढील महिन्यात होणार असून त्यामध्ये मसुद्याला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर तो मसुदा मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.