आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Counciling Treatment On Fundamentalism, College Use On Trick For Students

कट्टरतेवर समुपदेशनाने ‘उपचार’, विद्यार्थ्यांना धार्मिक मूलतत्त्ववादापासून दूर ठेवण्‍यासाठी नवा मार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नवीन पनवेलमधील अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक महाविद्यालयात दैनंदिन वर्ग नियमित भरतात.
मुंबई - अंजुमन - ए - इस्लाम या संस्थेचे अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, प्लॉट नंबर - ३, सेक्टर - १६, खांदा गाव, ठाणा नाक्याजवळ, नवीन पनवेल... खरेतर एरवी एखाद्या कॉलेजचा असतो तसा या कॉलेजचाही पत्ता असायला हरकत नव्हती... पण इराकमध्ये अतिरेकी कारवाया करत असलेल्या ‘इसिस’ या संघटनेत सामील व्हायला गेलेल्या कल्याणच्या चार भारतीय तरुणांपैकी सध्या भारतात परतलेल्या आरिब मजिदने या काॅलेजमध्ये शिक्षण घेतल्यामुळे ही संस्था वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. याच "वेगळ्या' ओळखीने सध्या कॉलेजचे व्यवस्थापन हैराण झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबोलीच्या एमजीएम मेडिकल कॉलेजच्या सर्कलला वळसा घालून पनवेलच्या दिशेने जाताना रस्त्यालगत असलेली कलिंगडांच्या दुकानांची रांग संपल्यावर एक मोठा फ्लायओव्हर ब्रिज लागतो. या ब्रिजच्या मधोमध पोहोचल्यावर उजवीकडे पाहिल्यास एका कॉलेजची प्रशस्त इमारत आणि त्यापुढील विस्तीर्ण मैदान दिसते. ब्रिज संपताच पनवेलच्या दिशेने न जाता उलट दिशेला वळून साधारण किलोमीटरभर पुढे गेल्यावर काळसेकर पॉलिटेक्निकचे प्रवेशद्वार लागते.. दुपारी एकची वेळ.. मैदानात कॉलेजची मुले विरुद्ध प्राध्यापक असा क्रिकेटचा सामना रंगलेला होता... उर्दू मिश्रित हिंदीतून बोलणा-या समालोचकाचा आवाज कानी पडतो.. गेटवरचा चौकीदार विचारतो,"किससे मिलना है'?.. प्राचार्यांना भेटायचे आहे,’ असे सांगताच त्याने मैदानात कमरेवर हात ठेवून सामना बघत असलेल्या एका माणसाकडे बोट दाखवून सांगितले, "उनसे मिलो, वो आपको बडे सर से मिलवाएंगे'.. त्या माणसाला ओळख सांगून येण्याचा हेतू सांगितल्यानंतर त्याने कॉलेजच्या इमारतीतल्या रिसेप्शनजवळच्या वेटिंग रूममध्ये नेऊन बसायला सांगितले. काही वेळानंतर क्रिकेटपटंूच्या पोशाखात दोन प्राध्यापक आले आणि हस्तांदोलन करून आपल्या संस्थेत येण्याचे प्रयोजन विचारू लागले.

प्रतिमा खराब झाली
इराकला गेलेल्या कल्याणच्या चार युवकांचा संदर्भ सांगितल्यावर प्राध्यापकांनी माहिती देण्यास सुरुवात केली. ‘या प्रकरणानंतर आमच्या कॉलेजची प्रतिमा खराब झाली आहे. अकरा वर्षांपूर्वी फक्त ३५ विद्यार्थ्यांनिशी सुरू केलेल्या या संस्थेत सध्या दोन हजारांच्या आसपास विद्यार्थी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतात. त्यांचे पालक सध्या या मुलांच्या भविष्याच्या चिंतेने धास्तावले आहेत’, अशी माहिती एका प्राध्यापकाने दिली.

आम्ही दहशतवाद शिकवतो काय?
> वर्तमानपत्रांतील बातम्यांबद्दल प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. "आमच्या कॉलेजमध्ये जणू दहशतवादाचं प्रशिक्षणच दिले जात असल्याचा खोटा प्रचार काही वृत्तपत्रे करत आहेत. निवडणुकांची मतमोजणी होते. त्या वेळी इथे तहसीलदार, पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधी आणि बड्या सरकारी अधिका-यांचा वावर असतो. मग जर आमच्या कॉलेजमध्ये काही बेकायदेशीरपणे सुरू असते तर त्याबाबत या लोकांना कधीतरी संशय आला नसता का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
> "शिवाय आमच्या संस्थेत फक्त मुस्लिमच मुले शिक्षण घेतात का? तर तसेही नाही.. हिंदू आणि इतर धर्माची मुलेही इथे शिकतात.. आमच्यापैकी काही प्राध्यापकही हिंदू आहेत..त्यांना विचारा अशा काही हालचाली त्यांना जाणवल्यात का?,' असा प्रश्न दुस-या प्राध्यापकाने उपस्थित केला.

तपास यंत्रणेचा ससेमिरा
इराकला गेलेल्या त्या चार युवकांपैकी आरिब हा याच कॉलेजचा माजी विद्यार्थी असल्याने सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर हे कॉलेज आले आहे. माध्यमांमधूनही त्या विषयीच्या येत असलेल्या बातम्यांमुळे सध्या इथले व्यवस्थापन हादरून गेले आहे. या प्रकरणामुळे पुढच्या वर्षी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळेल, याची चिंता संस्था व प्राध्यापकांना लागली आहे.

पाेलिसांची मदत
धार्मिक मूलतत्त्ववादाकडे मुलांनी वळू नये म्हणून आता काळसेकर कॉलेजचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहे. पोलिसांच्या मदतीने एक कार्यक्रम आखण्यात येणार असून त्या दृष्टीने आम्ही नियोजन करत असल्याची माहिती व्यवस्थापनातल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शिवाय इतर अल्पसंख्याक संस्थांनीही या कार्यक्रमात सामावून घेणार असल्याचे ते म्हणाले.

नाव सांगण्याची धास्ती
‘पोलिसांच्या मदतीने कॉलेजमध्ये समुपदेशन वर्ग घेतले जाणार आहेत काय?’ या प्रश्नावर "अजून सूचना आल्या नाहीत, मात्र आमच्या मुंबईतल्या संचालक मंडळाने तसा निर्णय घेतला असावा,’ अशी सावध प्रतिक्रिया दुस-या प्राध्यापकाने दिली.. ‘प्राचार्यांना भेटता येईल का? या प्रश्नावर "ते सुटीवर आहेत’ तसेच संचालकही व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. प्राध्यापकांनीही नावे सांगण्यास नकार दिला.