आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खत व अन्य वस्तूंचे पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा होणार : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘रब्बीचा हंगाम सुरू असताना नाेटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खते आणि अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी अडचणी येत अाहेत. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले अाहेत. आता नोंदणीकृत वितरकांच्या थेट खात्यात पैसे जमा करण्याची योजना त्यासाठी तयार करण्यात अाली अाहे. त्यामुळे आगामी काही दिवसात शेतकऱ्यांना खते आणि अन्य वस्तू विकत घेतल्यास विक्रेत्यांना राेख द्यावे लागणार नाहीत तर ते वितरकाच्या खात्यात जमा केले जातील,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. तसेच येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील ग्रामीण भाग पूर्णपर्ण कॅशलेस करण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासावर मार्ग काढण्यासाठी फडणवीस यांनी रविवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीबरोबर मुंबईत बैठक घेतली. एसबीआयच्या अध्यक्षा, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष आणि नाबार्ड व आरबीआयचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू नोंदणीकृत वितरकांकडून विकत घेतल्यास यापुढे कॅश द्यावी लागणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल. त्यासाठी एसबीआय एक छोटे उपकरण तयार करून देणार अाहे. या उपकरणाद्वारे वितरकाच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. कर्जाची रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट देण्यात येणार आहे. जिल्हा बँकांपुढील अडचणी दूर करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. बाजार समित्यातही नोटाबंदीमुळे समस्या निर्माण झाली आहे. बाजार समित्यात ६० टक्के व्यवसाय कॅशलेसच होतो. फक्त ४० टक्के रोखीने होतो. हा रोखीचा व्यवहारही कॅशलेस करण्यावर शासन भर देणार अाहे,’ असे फडणवीस म्हणाले.

सरकारची सेवा केंद्रे देणार बॅंकिंग सुविधा : शासकीय सेवा केंद्रांना बँकिंग करस्पॉन्डन्सचा दर्जा देऊन त्याद्वारे व्यवहाराची साेय उपलब्ध करून देण्याचाही सरकारचा प्रयत्न सुरू अाहे. ज्या ठिकाणी बँकांच्या शाखा नाहीत तेथे सरकारी सेवा केंद्रे बँकिंगची कामे करतील. ग्रामीण भागात ‘रुपे कार्ड’चे वाटप झाले अाहे, परंतु त्यापैकी फक्त ५० टक्केच कार्ड सुरू आहेत. उर्वरित कार्डही सुरू करून कॅशलेस व्यवहार कसे वाढविता येतील, यासाठी सरकारचे प्रयत्न अाहेत. बँकर्सनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...