आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात फूट पाडण्याचे सुनियोजित षडयंत्र! अशोक चव्हाण यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात धार्मिक विभाजनाचे आणि मतांच्या धृवीकरणाचे षडयंत्र आखण्यात आले आहे. त्यासाठी धार्मिक कट्टरतेला हेतुपुरस्सर खतपाणी घातले जात असून, एका धर्माकडून आक्रमक भूमिका मांडली की दुस-या धर्माच्या नागरिकांचे आपसूकच धृवीकरण होईल, अशी खेळी खेळली जात आहे.
या कारस्थानामागे भाजप, शिवसेना, संघ आणि त्यांच्या विचारधारेशी जुळलेल्या संघटना असल्याचे प्रकर्षाने जाणवते, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
मुस्लिमांचा मताधिकार काढून टाकण्याची भाषा असो वा, हिंदूंनी ५ मुले-१० मुले जन्माला घालण्यासंदर्भातील विधाने असो, हे सारे काही एका सुनियोजित कटाचा भाग आहे. देशातील सर्वसमावेशक विचारधारा कायम असेपर्यंत आपल्याला निरंकुश सत्ता मिळणार नाही, याची जाणीव भाजप-सेनेला आहे. त्यामुळेच देशातील धर्मनिरपेक्ष विचारधारेवर घाला घालण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.

त्यांची रणनीती केवळ वर्तमान काळापुरती मर्यादित नसून, भविष्यातही संशयाचे वातावरण कायम राहण्यासाठी नव्या पिढीची दिशाभूल सुरू आहे. सोशल मीडियातून खोटा व चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. तरुणांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये हवे ते बदल करण्यासाठी तिथे संघाची विचारधारा मानणारी मंडळी घुसवली जात आहे. अशा बिकट परिस्थितीत देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे असेल तर आतापासून व सामूहिकपणे कामाला लागण्याची आवश्यकता आहे. भाजप-सेनेचा हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वसमावेशक व सर्वव्यापक विचारधारा अधिक मजबूत करावी लागेल, असे आवाहन चव्हाण यांनी केले.