आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO आणि PHOTOS मध्ये बघा राज्यात सर्वदूर झालेला विक्रमी पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ नाशिक/ पुणे- शुक्रवारी (8जुलै) रात्रीपासून महाराष्ट्रात पावसाने जणू ताल धरला आहे. कुठे रिपरिप तर, कुठे मुसळधार...पावसाला रोधक आणि पूरक ठरणाऱ्या बदलत्या नैसर्गिक घटकांच्या परिणामी दुष्काळग्रस्त महाराष्ट्राच्या चेहर्‍यावर या पावसाने हसू फुलवले आहे. अर्थातच अल निनोसारख्या घटकामुळे गेली काही वर्षे अडलेला पाऊस यंदा ला-निनाच्या आगमनामुळे मनसोक्त कोसळत आहे.

मान्सूनच्या आगमनानंतर जून महिन्यात राज्यात विदर्भ-मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस झाला खरा; परंतु मोजक्या ठिकाणीच मोठे पाऊस झाले. जून महिना रिमझिम पावसातच सरला. मात्र, जुलै महिन्यात वरुणराजाची पूर्ण कृपादृष्टी झाली आणि इतके दिवस कोरडाठाक राहिलेला सह्याद्रीचा माथा आणि त्याच्या कुशीत वसलेला परिसर शनिवारपासून चिंब झाला आहे. नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नवचैतन्य आणले आहे. धरणांतील पाणीसाठ्यांतही वाढ होत असून शेतकरी सुखावला आहे.

नाशकात पाऊस, मराठवाड्यात आनंदप्रवाह
नाशिकला गोदावरीला आलेल्या पुरामुळे या मार्गावर असलेल्या धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या मार्गावरील ९ टप्पे ओलांडून सध्या मृतसाठा जपणाऱ्या जायकवाडी धरणाला गोदावरीतून मनसोक्त जलप्रवाहाची प्रतीक्षा आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे जायकवाडीवर अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत.
परिसर आबादानी...
अाषाढच्या प्रारंभाला पहिली झलक दाखवलेल्या वरुणराजाने अाठवडाभरानंतर खऱ्या अर्थाने लक्षधारांनी जलवर्षाव करीत नाशिक परिसराला अाबादानी करून टाकले. शनिवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे गाेदापात्रात सकाळी ११ पासून पाण्याची पातळी वाढण्यास प्रारंभ झाला. दुपारी ४ पर्यंत पुराने जाेर धरला. दुपारी गंगाकाठावरील अनेक टपऱ्या तसेच काही दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात वाहून गेल्या.

काेयना, उजनीतही आशादायक चित्र
निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात चोवीस तासांत १४३ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरण क्षेत्रातील पावसाने यंदा हजार मिलिमीटरचा आकडा ओलांडला आहे. एकूण २८३५.५४ दलघमी जिवंत जलसाठा असलेल्या या धरणात आता ६४०.७७ दलघमी पाणीसाठा झाला आहे. याशिवाय, वारणा, दूधगंगा, राधानगरी, कासारी, पाटगाव, तुळशी या कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्येही सर्वत्र सव्वाशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला. सोलापूरसह मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या उजनी धरणासाठीही आशादायक स्थिती आहे. मुळा खोऱ्यातील धरणांच्या क्षेत्रात पावसाने सव्वाशे मिलिमीटरचा आकडा ओलांडला.
चार दिवस जोर कायम..
येत्या चार दिवसांपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली.
विक्रमी पावसाने गोदावरीलाही भरते
नाशिक परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने तर विक्रमच प्रस्थापित केला. रविवारी सकाळपासून शहरात ९ तासांत तब्बल १३३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. यापूर्वी २२ जुलै २००५ रोजी एका दिवसात १०९ मिमी आणि ७ ऑगस्ट २००६ रोजी ११०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा पावसाने ९ तासांतच ही आकडेवारी ओलांडत विक्रमी बरसात केली आणि गोदावरी नदीला पूर आला. रामकुंड परिसरातील मंदिरे पाहता पाहता पाण्याखाली गेली.
ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही अतिवृष्टी
अाैरंगाबाद- ३ वर्षांपासून प्रशांत महासागरात मुक्कामी व दुष्काळास कारणीभूत अल निनोने अखेर निराेप घेतला आहे. या सागराचे तापमान सामान्य पातळीवर असून ला-निनाला अनुकूल स्थिती आहे. यामुळे सध्या राज्यात मान्सूनने जोर धरला. जुलैप्रमाणेच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यात अतिवृष्टीचा अंदाज अाहे. नांदेडच्या एमजीएम खगोल व अंतराळ संशोधक केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले की, प्रशांत महासागरात असलेला अल निनो जूनअखेर अस्तंगत झाला आहे. त्यामुळे प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीत आले आहे.
ला निना वाढवणार पाऊस :
मे-जून,जुलैमध्ये अल निनो ५१ टक्के सक्रीय होता, तर ला निनाची शक्यता केवळ ९ टक्के होती. जून-जुलै-ऑगस्टमध्ये ला-निना व सर्वसाधरण स्थिती ८० ते ९० टक्के सक्रीय राहील, असा अंदाज अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने वर्तवला आहे. भारतात भरपूर पावसासाठी सामान्य स्थिती व ला-निना हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. ते जुल ते सप्टेंबरमध्ये सक्रीय राहणार असल्याने तिन्ही महिन्यांत देशात चांगला पाऊस होईल.
नंदुरबार जिल्ह्यात चार जण वाहून गेले
नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी गावातील आष्टी सर्कलमध्ये झालेल्या मुसळधार पाऊसाच्या पाण्यात वाहून चार जण मृत्युमुखी पडले असून दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. या पुराच्या पाण्यात बारा ते पंधरा जण वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पावसाच्या या कहरामुळे याभागात असलेला रेल्वे मार्गही वाहून गेल्याने नंदुरबार सुरत रेल्वेचे पाच डब्बे रुळावरून घसरून काही भागात रेल्वेचे इलेक्ट्रिक पोल डब्यावर कोसळले आहे. सुदैवाने या रेल्वे गाडीत कमी प्रवासी बसले होते. पाच प्रवाश्यांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे कळतेय. मात्र नंदुरबार तालुक्यातील पाचोरा बारीत पावसाच्या कहर इतका प्रचंड आहे की त्यात १०० घरांचे मोठे नुकसान झाले असून २० ते ३० जनावरेही या पाण्यात वाहून गेली आहेत. रेल्व अपघातामुळे भुसावळ - सुरत या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे विस्कळीत झाली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा.... नाशिकच्या गोदावरीचा पूर बघा व्हिडिओत...
- रेल्वेमार्गाचा भराव वाहून गेल्याने सुरत-भुसावळ पश्चिम रेल्वे वाहतूक पुर्णपणे कोलमडली...
- औरंगाबादेत पावसाचा जलवा...
- बुलडाण्‍यात भिंत पडून महिला ठार...
- विदर्भात 150 गावांचा संपर्क तुटला...
- चंद्रपूरमध्ये इंडिका कार वाहून गेली, चौघे बेपत्ता...
- सांगली जिल्ह्यात संततधार सुरूच...
- दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरला झोडपले...
- जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला...


(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...