आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Dismisses PIL In Sharad Pawar Double Voting Remark News In Marathi

शरद पवारांच्या वक्तव्यावर हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दोनदा मतदान करण्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिवाय निवडणूक आयोजनाबाबतचे सर्वाधिकार हे निवडणुक आयोगाला असल्यामुळे मुंबई आणि सातार्‍यातील निवडणूक एकाच दिवशी घ्यावी याबाबत याचिकाकर्त्याने न्यायपालिकेऐवजी निवडणूक आयोगाला विनंती करावी, असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे.

गावाकडे मतदान झाल्यानंतर लगेचच शाई पुसून पुन्हा मुंबईत येऊन मतदान करा, या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबईमध्ये बोगस मतदान होण्याची शक्यता असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सोमवारी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. हे बोगस मतदान टाळण्यासाठी सातारा आणि मुंबई या दोन मतदारसंघात एकाच दिवशी निवडणुका घेण्याची विनंतीही या याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

निवडणूक आयोगालाही पत्र
सातार्‍यात 17 एप्रिलला होणार्‍या मतदानाची तारीख पुढे ढकलून ती 24 एप्रिल म्हणजेच मुंबईच्या मतदानाबरोबरच व्हावी अशी विनंती करणारे पत्र आपण 2 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय लगेच होणे अशक्य असल्याने याचिका दाखल केल्याचे वाटेगावकर म्हणाले.