आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील गोवंश हत्या बंदी कायदा मागे घ्या - रामदास आठवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात १९७४ मध्येच गोहत्याबंदी अमलात आली. आता नव्याने मंजूर केलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे निरुपयोगी बैल आणि भाकड जानावरे कापण्यास बंदी आली. शेतकरी, मुस्लिम व मागास जातींसाठी हा कायदा अडचणीचा ठरत ठरणार आहे. सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली.

रविवारी बांद्रा-कुर्ला संकुलात रिपाइंच्या राज्य अधिवेशनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, गोवंश हत्याबंदीमुळे मटण महागले, अनेकांचे रोजगार हिरावले, शेतकर्‍यांच्या बैलाला किंमत उरली नाही. त्यामुळेच गोव्यात भाजपची सत्ता असूनही तेथील पार्सेकर सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू करण्यास नकार दिल्याचा दावा आठवलेंनी केला. दरम्यान, रिपाइच्या मोबाइल अॅपचे मेळाव्यात लाँचिग करण्यात आले.

चारोळीची धमाल
आठवले यांनी नेहमीप्रमाणे भाषणाची सुरुवात चारोळीने केली. ‘जरी मला मिळाली नाही सत्ता, तरी मी गिरवत राहणार आहे माझ्या भीमाचा कित्ता’, त्यांच्या या कवितेला कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली.

आंबेडकरांचे स्मारक समुद्रात उभारा
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभे राहत आहे. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे का नाही, असे म्हणत बाबासाहेबांचाही पुतळा समुद्रात उभा करा, अशी मागणी आठवलेंनी केली.

मंत्रिपदे द्या, नाही तर साथ सोडावी लागेल
‘सगळे मंत्री तुमचे, मग आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलो काय? आमची मते तुम्हाला मिळाली आहेत. म्हणून आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे, नाही तर तुमची साथ सोडावी लागेल,’ असा इशाराही आठवले यांनी सरकारला दिला.