आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CPI(M) Leader K L Bajaj Dead News In Divya Marathi

कामगार नेते के.एल. बजाज यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ट्रेड युनियनचे नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य काँ. के. एल. बजाज (79) यांचे शुक्रवारी दुपारी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि दोन पुत्र असा परिवार आहे.

बजाज अखिल भारतीय ‘सिटू’चे उपाध्यक्ष होते. तसेच राज्य ‘सिटू’चे उपाध्यक्षही होते. त्यामुळे राज्यातील अनेक कामगार संघटनांशी चांगले संबंध होते. कामगारांच्या समस्यांची चांगली जाण असल्याने ते कामगार वर्गात सर्वदूर परिचित होते. इंजिनिअरिंग वर्क्स युनियन, जनरल एम्प्लॉइज युनियन तसेच रिलायन्स इलेक्ट्रिसिटी कंपनीतील कंत्राटी कामागारांच्या संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

महाराष्ट्रातील कामगार संघटनांच्या बांधणीत बजाज यांचा मोठा वाटा होता. 1984 मध्ये महाराष्ट्र राज्य ‘सिटू’चे ते जनरल सेक्रटरी म्हणून निवडले गेले.‘माकप’च्या केंद्रीय कमिटीचे सदस्य असलेल्या बजाज यांच्यावर पक्षाच्या राज्य कमिटीच्या सचिव मंडळाच्या सदस्यपदाची जबाबदारी होती.

गेल्या 60 वर्षांपासून राजकीय व ट्रेड युनियन संघर्षामध्ये बजाज यांना अनेकदा अटक झाली होती. अनेक वर्षे त्यांनी कारावास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्तिसंग्रामात बजाज यांचा सक्रिय सहभाग होता.

शनिवारी सकाळी बजाज यांचे पार्थिव पक्षाच्या वरळी येथील ‘जनशक्ती’ कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांयकाळी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.