आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकांवरील अत्याचारांत वाढ! महिलांवरील 91 टक्के गुन्हे प्रलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘इतर राज्यांच्या तुलनेत गुन्हेगारी कमी झाली, महाराष्ट्रात महिला अधिक सुरक्षित आहेत,’ असे दावे करणार्‍या राज्य सरकारच्या डोळ्यात नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालाने झणझणीत अंजन घातले आहे. 2011 मध्ये राज्यात दहा वर्षांखालील बालिकांवरील अत्याचारात सुमारे 26 टक्के वाढ झाली आहे, तर 14 ते 18 वयोगटातील मुली-युवतींवरील बलात्काराच्या घटनांत सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराचे एकूण 91.78 टक्के गुन्हे प्रलंबित आहेत.

स्वयंसेवी संस्था समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्राने प्रकाशित केलेल्या अहवालातून हे वास्तव उजेडात आले आहे. राज्यात एक लाख लोकसंख्येमागे फक्त 157 पोलिस असल्याचेही अहवालात म्हटले आहे. एक लाख लोकसंख्येमागे औरंगाबाद ग्रामीण 65 पोलिस, सोलापूर 60 पोलिस आणि पुणे ग्रामीण येथे 61 पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. अमरावती शहरात गुन्ह्यांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे 372 असून राज्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. एवढेच नव्हे तर महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही अमरावतीतच (26.90 टक्के) आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रमाण एकूण गुन्ह्याच्या 15.30 टक्के आहे.

मुंबई, नाशिक, औरंगाबादेत गुन्हे वाढले
मुंबई, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई या नऊ प्रमुख शहरांत 2011 मध्ये 81 हजार 832 गुन्ह्यांची नोंद झाली. राज्यातील गुन्ह्यांच्या तुलनेत फक्त या नऊ शहरांतील गुन्ह्यांची टक्केवारी 39.93 टक्के आहे. या शहरांमध्ये खून (26.29 टक्के), बलात्कार (32 टक्के), अपहरण (35.29 टक्के), फसवणूक (53 टक्के), हुंडाबळी (14 टक्के), लैंगिक छळ (39.86 टक्के) अशी आकडेवारी समोर आलेली आहे. राज्याच्या तुलनेत मुंबईत नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 15.93 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कोल्हापुरात अधिक अत्याचार
राज्यात अनुसूचित जाती-जमातींवरील गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, नागपूर, ठाणे येथे 995 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात 80 गुन्हे बलात्काराचे आहेत. कोल्हापूर येथे 205 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही 2011 मध्ये सर्वाधिक 64 गुन्हे कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 52 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांविरोधातही तक्रारी वाढल्या
2011 मध्ये पोलिसांविरुद्ध 5541 तक्रारी नोंदवण्यात आल्या. 2010 च्या तुलनेत यामध्ये 12.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1986 पासून 2013 पर्यंत राज्यातील विशेष न्यायालयांमध्ये भ्रष्टाचाराचे 2,142 गुन्हे प्रलंबित आहेत. यापैकी नाशिकमध्ये 297, पुणे 330 आणि नागपूरमध्ये 426 प्रकरणे प्रलंबित असल्याचे अहवालात म्हटले आहे.