आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Against Women Rises In Mumbai; Conviction Rate Low At 8%

एक तृतीयांश मुंबईकर अजूनही गुन्हेगारी जगताच्या दहशतीतच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता गुन्हेगारी कारवायांसाठी प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असून यंदाच्या वर्षी बलात्कार, विनयभंग, घरफोडी, रेल्वे अपघात, सोनसाखळी हिसकावणे अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून ३२ टक्के मुंबईकर शहरात असुरक्षित जीवन जगत असल्याचे वास्तव प्रजा फाउंडेशनच्या श्वेतपत्रिकेत मांडण्यात आले आहे.

मुंबई शहर आता गुन्हेगारी कारवायांसाठी प्रख्यात होत आहे. यंदा मुंबईत सोनसाखळी चोरण्याच्या घटना ६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये ४७ टक्के वाढ तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत ५२ टक्के वाढ झाल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे.

पोलिस कंट्रोल रूमशी संपर्क साधल्यानंतर आपल्या तक्रारीची दखल योग्यपणे घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उत्तर मध्य मुंबई परिसर गुन्हेगारीत सर्वात पुढे आहे. या भागात वर्षभरात घरफोडीचे ७३४, चोरीचे १५९८ तर वाहनचोरीचे ८९१ गुन्हे नोंद झाले आहेत.

मुंबईसाठी ४१ हजार ६६३ पोलिस आणि अधिकार्‍यांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात ३७ हजार १५९ पोलिस आणि अधिकारी कर्तव्यावर आहेत. मुंबई पोलिस दलातील अपुर्‍या मनुष्यबळामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळेही गुन्हेगारी वाढीस चालना मिळाल्याचे विश्लेषण अहवालात मांडण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी केवळ २२ टक्के गुन्हेगारांवरचे आरोप सिद्ध होऊ शकले आहेत. गुन्हेगारांच्या मोकाट सुटण्याचे प्रमुख कारण म्हणजे पुराव्यांचा अभाव होते. त्यामुळे तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्या कार्यक्षमतेवरही या अहवालात प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यावरून राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचे चित्र समोर येते.

उत्तर मुंबईत अधिक गुन्हे
मुंबईत लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यातील उत्तर मुंबई मतदारसंघात गुन्ह्यांचा आलेख अधिक आहे. म्हणजेच मालवणी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर परिसरातील ४५ टक्के नागरिकांना असुरक्षित वाटते. उर्वरित पाच मतदारसंघातील ३० टक्के नागरिकांना सुरक्षित वाटते. अशा प्रकारे एक तृतीयांश मुंबईकर सध्या भीतीच्या छायेखाली जगतो आहे.