आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता परत करण्याची बेबीची विनंती फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अटकेच्या वेळी घरातून जप्त केलेल्या वस्तू परत मिळण्याबाबत ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर हिने केलेला विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळत त्यासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे निर्देश सोमवारी दिले. बेबी ही मेफेड्रोन म्हणजेच एमडी या अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील प्रमुख आरोपी असून सध्या ती जामिनावर बाहेर आहे.

एप्रिल महिन्यात वरळी येथील बेबीच्या घरातून पोलिसांनी एमडीचा मोठा साठा जप्त केला होता. त्यावेळी तिच्या घरातून वीस मोबाईल फोन, तीन कार, काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, बँक पासबुक आणि पस्तीस हजाराची रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. काही दिवसांनंतर तिच्याकडून जप्त केलेला अंमली पदार्थ हा एमडी नसून अजिनोमोटो असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिल्यानंतर बेबीला जामीनही मिळाला होता. अटकेच्या वेळी जप्त केलेली ही मालमत्ता आपल्याला परत करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी विनंती तिने एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली होती. तसेच अटकेच्या वेळी आपल्या निवासस्थानावरील सीसीटीव्ही कॅमेराचीही पोलिसांनी मोडतोड केल्याने त्या कॅमेराची दुरुस्ती करून देण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, असेही बेबीने या अर्जात म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...