आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत बलात्कार, वाहनचोरी, घरफोडीच्या घटनेत वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: मुंबई शहरामध्ये बलात्कार, वाहनचोरी, घरफोडीच्या घटना 2010 च्या तुलनेत 2011 या सरलेल्या वर्षात वाढल्या असल्याचे एका अहवालात उघडकीस आले आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी दरोडा, चोरीच्या गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून पुढे आले आहे.
शहर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी दरोड्यांचे 464 गुन्हे घडले. 2007 नंतरच्या वर्षांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. 2007 मध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण 292 होते. हा गुन्हा शोधण्याचे गेल्या वर्षभरातील प्रमाण 84 टक्के होते. गेल्या पाच वर्षांमध्ये दरोड्यांच्या गुन्ह्यांतील मुद्देमाल शोधून काढण्याचे प्रमाण 43 टक्के राहिले, असे पोलिसांच्या आकडेवारीतून उघड झाले आहे.
या गुन्ह्यांचे प्रमाण का वाढले, या प्रश्नाच्या उत्तरात एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, एखाद्या आरोपीने मंगळसूत्र चोरी केली असेल आणि त्या ठिकाणी शस्त्र सापडले असेल तर हा गुन्हा दरोडा म्हणून नोंदला जातो. त्यामुळे मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याचे प्रमाण कमी दिसते आणि त्याच वेळी दरोड्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कायद्याच्या परिभाषेनुसार गुन्ह्याचे स्वरूप बदलत असल्याने अशा प्रकरणांमध्ये केवळ आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कायद्यानुसार ती केलेली व्यवस्था आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
याबरोबर गेल्या वर्षामध्ये शस्त्रास्त्र जप्त करण्याचे प्रमाण त्याआधीच्या वर्षापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. 2010 मध्ये 271 शस्त्रे जप्त करण्यात आली, तर गेल्या वर्षी विविध गुन्ह्यांमध्ये 299 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
ताब्यात घेतलेली बहुतांश शस्त्रे देशी बनावटीची असून ती उत्तर प्रदेश अथवा बिहारमध्ये बनवण्यात आली असावीत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.