आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Registered Against Ghosalkar In The Case Sheetal Mhatre

शीतल म्हात्रेंच्या छळप्रकरणी आमदार घोसाळकरांवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात शुक्रवारी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगानेही त्यांना नोटीस बजावून 30 जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी दिली.
गेले काही दिवस शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे आणि माजी महापौर शुभा राऊळ या दोघी घोसाळकरांकडून मिळत असलेल्या अन्यायकारक वागणुकीविरोधात आवाज उठवत आहेत; परंतु पक्षश्रेष्ठी तक्रारींची दखल घेत नसल्याने त्या उद्विग्न झालेल्या आहेत. ‘श्रीकृष्णरूपी’ उद्धव ठाकरे यांचा धावा करूनही पक्षप्रमुखांनी भेटण्यास वेळ न दिल्याने शिवसेनेतील अन्य महिला कार्यकर्त्याही संतापल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी मनस्तापामुळे म्हात्रे यांचा रक्तदाब वाढला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आधी आमदार नीलम गो-हे यांनी व नंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांनी शुक्रवारी म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली होती.
मनसेने विचारला जाब
या छळप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी नगरसेविकापदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर पक्षश्रेष्ठींनी समजावल्यानंतर त्यांनी तो मागे घेतला. तसेच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन दहा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. दरम्यान, मनसेच्या महिला नगरसेविकांनी शुक्रवारी महापौर सुनील प्रभू यांना म्हात्रे छळप्रकरणी जाब विचारला.
सहा प्रश्नांची उत्तरे द्या : वाघ
चित्रा वाघ यांनी सांगितले की, एका पक्षात महिलांवर अत्याचार होत असताना त्यांचे नेते पाहत बसलेले आहेत, हे योग्य नाही. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांमधून महिला आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. या छळामागे घोसाळकर असल्याचे समोर आल्याने त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. 30 जानेवारीपर्यंत त्यांनी उत्तर दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.