आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crises On Bjp Sena For Deputy Chief Minister Ajit Pawar Issue

शिवसेना-भाजपमध्ये फूट!, अजित पवारांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पुन्हा पडसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद सोमवारीही विधान परिषदेत उमटले. याबाबत चर्चेस उपसभापतींनी नकार दिल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बैठा सत्याग्रह केला. भाजपने मात्र त्यांना साथ न देता बाकावर बसणेच पसंत केले.


प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दिवाकर रावते यांनी उजनी धरणातील पाण्याबाबत चर्चा करण्यासाठी नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडला. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्याला परवानगी दिली. चर्चेला सुरुवात करताना रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यावर राष्‍ट्रवादीचे अमरसिंह पंडित, किरण पावसकर, राम पंडागळे, विक्रम काळे, रमेश शेंडगे, हेमंत टकले आणि जयवंत जाधव यांनी जोरदार घोषणाबाजी करीत भाषणात व्यत्यय आणला. त्याला विरोधकांनीही प्रत्त्युत्तर दिल्याने गोंधळ वाढला. त्यामुळे सभापतींनी दोन वेळा 15-15 मिनिटांसाठी आणि नंतर एकदा दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर उपसभापती वसंत डावखरे यांनी 289 चा प्रस्ताव नाकारत असल्याचे सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी अजित पवार यांनी राजीनामा देईपर्यंत आपण खाली बसून कामकाज करू असे सांगितले. दिवाकर रावते, नीलम गो-हे, विनायक राऊत, रामदास कदम यांच्यासह शेकापचे जयंत पाटील यांनी सभागृहात बैठक मारली. मात्र भाजपचे सदस्य आसनावरच बसून राहिले.


विधानसभेत सभात्याग
विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडू पाहणा-या एकनाथ खडसे यांना अध्यक्षांनी परवानगी नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला. नंतर कामकाज सुरू झाल्यानंतर पवार राजीनामा देणार नसतील तर त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी खडसेंनी केली.