आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेस १० अाॅगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत विमा कंपन्यांनी योजनेस मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय घेण्यात अाला.

पीक विम्याच्या योजनेसाठी मुदतवाढ देण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. राज्यामध्ये नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांकडून अगदी वेळेवर योजनेचे अर्ज उपलब्ध झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत होती. योजनेत सहभागी होण्यासाठीच्या मुदतीस अल्प कालावधी उरल्याने मुदतवाढ देण्याची आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली होती. मुदतवाढ न दिल्यास विमा कंपन्यांना रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला हाेता. अन्य सहा राज्यांमध्येही या योजनेसाठीची मुदत १५ ऑगस्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.

महाराष्ट्रात मुदतवाढ देण्यासाठी विमा कंपन्यांनी मधला मार्ग काढण्याचे सांगत मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने योजनेसाठीची मुदत २ ऑगस्ट ऐवजी १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

सहा क्लस्टरमध्ये विभागणी
राज्यामध्ये या योजनेसाठी सहा क्लस्टर करण्यात आले असून चार विमा कंपन्यांना ते विभागून देण्यात आले आहे. पहिल्या क्लस्टरमधील लातूर, अकोला, हिंगोली, सांगली, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी इफको टोकियो ही विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. तर उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रायगड या दुसऱ्या क्लस्टरसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. जालना, जळगाव, वाशिम, सोलापूर,भंडारा, सातारा या तिसऱ्या क्लस्टरसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. चौथे क्लस्टर असलेल्या परभणी, अमरावती, वर्धा, धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि पाचवे क्लस्टर असलेल्या बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर यासाठी रिलायन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बीड, अहमदनगर, नाशिक, रत्नागिरी, पुणे या सहाव्या क्लस्टरसाठी एचडीएफसी अरगो विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढे वाचा... शेतमाल नियंत्रण मुक्ती सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
बातम्या आणखी आहेत...