फाइल फोटो: अबू आझमी
मुंबई - महाराष्ट्रात पुढील महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासोबत प्रतित्रापत्रात दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोट्धीश उमेदवारांचा भरणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारांनी दाखल केलेल्या माहितीनुसार भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी 163.43 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. मलबार हिल सारख्या पंचतारांकित मतदारसंघातून निवडून आलेले लोढा यांचे वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे. तर सपाचे आमदार अबू आझमी यांनी 156.1 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. आझमी यांचा ट्रान्सपोर्ट आणि हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 127.57 कोटी रुपयांची स्थावर आणि 28.53 कोटींची जंगम मालमत्ता आहे.
संपत्तीच्या बाबतीत इतर हेविवेट नेते
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संपत्ती काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तुलनेत खूप अधिक आहे. चव्हाण यांच्याकडे 13.81 कोटींची संपत्ती आहे. त्यापैकी अधिक संपत्ती त्यांना वारसाहक्काने मिळाली आहे. तर अजित पवार यांनी 38.82 कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.89 कोटी एवढे आहे.
- नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी करणारे प्रकाश ठाकूरही संपत्तीच्या बाबतीच बरेच पुढे आहेत. त्यांनी 58.59 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न 5.61 कोटी रुपये आहे.
- काँग्रेसचे माजी मंत्री नारायण राणे यांच्याकडे 72.44 कोटींची संपत्ती आहे. प्रथमच निवडणुकीत उतरणारा त्यांचा मुलगा नीलेश राणे यांच्याकडे 11.8 कोटींची संपत्ती आहे. राणे यांनी शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती.
संपत्ती चारपटीने वाढली
2009 मध्ये मनसेकडून निवडणूक लढवणारे राम कदम यांनी त्यावेळी 13 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. आज आमदार राम कदम यांच्याकडे 39 कोटींची संपत्ती आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ताही 2009 मध्ये 16 कोटी होती हा आकडा 23 कोटीवर गेला आहे.
काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांनी 2009 मध्ये 80 लाख रुपये संपत्ती असल्याची घोषणा केली होती. ती 3.2 कोटीवर गेली आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 2009 मध्ये 8 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा केली होती. आज त्यांच्याकडे 21.47 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
महाराष्ट्रात 288 जागांसाठी 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी संपली. एकूण 7666 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 29 सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.