आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाच्या अंत्ययात्रेला जाण्यावरही मुख्य सचिव सहाय यांचा आक्षेप, मारला आक्षेपार्ह शेरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नैराश्यग्रस्त मुलाने तातडीने घरी यावे असा फोन केल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी उपसचिव राजेंद्र घाडगे यांना घरी जाण्यास परवानगी न दिल्याने घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. गुरुवारी मंत्रालय कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात सहाय यांच्याविरोधात आंदोलन केले. या प्रकरणाची मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय चौकशी करणार आहेत. दरम्यान, मुलाच्या अंत्ययात्रेला गेलेल्या घाडगे यांच्या वतीने एका दुसऱ्या कर्मचाऱ्याने अर्ज केला होता. त्यावर सहाय यांनी संतापजनक शेरा मारला. घाडगे यांनी स्वतः अर्ज का केला नाही अशी विचारणा सहाय यांनी केली आहे.

कृषी विभागात उपसचिव म्हणून घाडगे कार्यरत आहेत. सातवीत शिकत असलेला त्यांचा मुलगा अवधूत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता. शुक्रवारी त्याच्यात व आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. घाडगे यांच्या पत्नीने व मुलाने फोन करून घाडगेंना लवकर घरी येण्यास सांगितले. आज लवकर घरी आला नाहीत तर मी आत्महत्या करेन, असेही अवधूतने घाडगेंना फोनवरून बजावले होते. घाडगे यांनी सहाय यांच्याकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांनी घरी जाण्याची परवानगी दिली नाही. घाडगे घरी जाईपर्यंत त्यांच्या मुलाने आत्महत्या केली.
सहाय यांच्या मनमानीपणामुळे एका अधिकाऱ्याला त्याचा मुलगा गमवावा लागल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना भेटून कर्मचाऱ्यांनी निवेदनही दिले. हा प्रकार दुर्दैवी आहे. कृषिमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही बाजू समजून घेणार असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. उपसचिव घाडगे हे सोलापूर येथील सांगोला या त्यांच्या गावी आहेत. दोघांचेही म्हणणे ऐकल्यानंतरच याबाबत मत व्यक्त करता येईल, असे स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा, सहाय यांचा मनमानी कारभार.... शिस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा छळ... पाच वेळा तक्रारी....
बातम्या आणखी आहेत...