आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीचा त्रास कायम राहिल्यास त्याला सर्वस्वी मोदीच जबाबदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : पन्नास दिवसांनंतरही नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना होत असलेला त्रास कायम राहिला तर त्याला सर्वस्वी मोदीच जबाबदार असतील, अशा शब्दांत शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांची सोमवारी संध्याकाळी भेट घेतली.

सायंकाळी पाचच्या सुमारास रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांची आरबीआय मुख्यालयात शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यभरात सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली परवड आणि जिल्हा बँकांवरील व्यवहारबंदीमुळे ग्रामीण अर्थकारणावर झालेल्या विपरीत परिणामांची माहिती देणारे एक निवेदन शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गांधी यांना दिले. पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वागतच केले आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात सरकारला संपूर्ण अपयश आल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. निर्णयानंतर २७ दिवस उलटले असून अजूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

देशभरात तब्बल ८० लोकांचा रांगेत उभे राहण्याचा त्रास सहन न झाल्याने मृत्यू झाले आहेत. तसेच राज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या राज्यभरात असलेल्या ३७१ शाखांमधील व्यवहार ठप्प झाल्याने एकूणच ग्रामीण अर्थकारणाला खीळ बसल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. उच्च न्यायालयानेही या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या असून डॉ.अमर्त्य सेन आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही या निर्णयानंतर सरकारच्या शहाणपणावर प्रश्न उपस्थित केल्याचेही शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व बाबी समोर आल्यानंतरही सरकार एकूण परिस्थितीचा गंभीरपणे विचारच करत नसल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे किमान रिझर्व्ह बँकेने तरी हस्तक्षेप करत योग्य त्या उपाययोजना करून सर्वसामान्यांचा त्रास कमी करावा, अशी विनंतीही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आर. गांधी यांना केली. या शिष्टमंडळात खासदार अनिल देसाई, गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे आणि अरविंद सावंत यांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...