आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cyber Crime Cell In Mumbai Cyber Crime Investigation Cell

सायबर हल्ला राेखणारे केंद्र मुंबईत? एक हजार पाेलिसांना देणार प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशविघातक कृत्यांमध्ये आता सायबर दहशतवादाचा प्रसार वेगाने होत असून आर्थिक संस्था आणि सरकारी वेबसाइट हॅक करून डाटा नष्ट करण्याची भीती मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. हे सायबर हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच सर्टचे उपकेंद्र कफ परेड येथील महानगर टेलिफोन निगमच्या कार्यालयात वा बीकेसीमध्ये स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली. तसेच एक हजार पोलिसांना पुणे येथील ‘एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ’च्या माध्यमातून सायबर क्राइमबाबतचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर पोलिस दलाची नव्याने स्थापना करण्याबरोबरत सायबर हल्ले रोखण्यासाठी सर्टचे उपकेंद्र मुंबईत स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सर्वप्रथम ‘दिव्य मराठी'नेच दिली होती. देशामध्ये सायबर हल्ल्यापासून कंपन्या, आर्थिक संस्था आणि संरक्षण दलाला संरक्षण देण्यासाठी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या गृह विभागाने कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सर्ट) ची स्थापना केली आहे. २००५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने सरकारी विभागांना येणारे धमक्यांचे मेल आणि व्हायरसचा मुकाबला करणे सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सर्टचे प्रादेशिक उपकेंद्र मुंबईत उभारण्याची घोषणा केली होती.

कसे असेल ‘सर्ट’चे काम?
सर्टमध्ये नवी दिल्लीतील केंद्रामधून तज्ज्ञ येणार असून येथील निवडक पोलिसांना सायबर हल्ले कसे रोखायचे वा हल्ला झाला तर काय करायचे याचे प्रशिक्षण ते देणार आहेत. केवळ पोलिसांनाच नव्हे तर आर्थिक संस्था व सरकारी विभागांमधील निवडक लोकांनाही याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे सायबर हल्ले होण्यापूर्वीच रोखणे शक्य होणार अाहे.

मुंबईचीच निवड का?
गृह विभागातील सूत्रांनी सांगितले, मुंबईत रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजसह अनेक विदेशी बँकांचीही कार्यालये आहेत. या बँकांवर सायबर हल्ले करून डाटा हॅक होऊ शकतो व पैशांची अफरातफरही होऊ शकते. हे टाळण्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण सर्टतर्फे दिले जाते. त्यामुळे मुंबईत सर्टचे केंद्र आवश्यक असल्याने मुंबईत हे केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी कफ परेड येथील महानगर टेलिफोन निगमची जागा व बीकेसीमध्ये जागा घेऊन हे केंद्र उभारले जाणार आहे. हे उपकेंद्र उभारण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असू लवकरच हे केंद्र उभे केले जाईल.